दैनिक स्थैर्य । दि. २३ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्याला शुक्रवारी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये तसेच महाबळेश्वर पाचगणी येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन तुफान गारपीट झाली. या जोरदार पावसामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला या पावसाने द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. साताऱ्यात शाहूनगर येथील मंडळी कॉलनी मध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. सातारा शहरासह जिल्हयाच्या पश्चिम भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते . मात्र उकाड्याचा त्रास कायम होता. सायंकाळी चार वाजल्यापासूनच जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. विजांचा कडकडाटांसह सायंकाळी साडेपाच नंतर पावसाने जोर पकडला. सातारा जावली कराड वाई महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये तासभर जोरदार पाऊस झाला. भिलार खिंगर मेटगुताड येथे जोरदार गारांचा पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी पावसाचा आनंद लुटला. सातारा शहरात सुमारे तासभर झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. शाहूनगर मंगळाई कॉलनी येथे नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाने पेट घेतला.
साताऱ्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं प्रचंड उकाडा वाढला होता. त्यामुळे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सातारा शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर-पाचगणी येथील भिलर या भागात जोरदार गारपीट झाली. आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. सोसाट्याचा वाऱ्याने अनेकांची तारांबळ उडाली. वारा सुटल्याने सुमारे एक तासाहून अधिक काळ वीज गायब झाली होती. महाबळेश्वर मार्केटमध्ये अचानक पाऊस आल्यानं पर्यटकांची धावपळ उडाली.