स्थैर्य, सातारा, दि.२९: पुणे सातारा व पुणे बोरीवली विना वाहक विना थांबा सेवा पूर्ववत करण्यात आली आहे .क रोनाचा संसर्ग कमी झाल्याने या मार्गावर एसटीच्या फेऱ्या वाढविण्यात आल्याचे एसटी विभाग नियंत्रक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले .
करोनाच्या संसर्गामुळे लॉकडाउनच्या काळात वाहतूक व्यवस्था ठप्प होती. जुलै महिन्यानंतर काही प्रमाणात एसटी सेवा सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांअभावी फेऱ्यांची संख्या कमी ठेवण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात सातारा- स्वारगेट मार्गावर विनावाहक बस दिवसभरात केवळ 12 ते 15 फेऱ्या सुरू होत्या; परंतु मागील दहा दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढल्याने दर 30 मिनिटांनी सातारा-स्वारगेट मार्गावर बस सोडली जात असल्याचे एसटी विभागाने सांगितले आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात लॉकडाउनच्या काळात एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर वाहतूक सुरू होऊनही प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे फेऱ्या कमी ठेवण्यात आल्या होत्या. कोरोना संसर्ग येणापूर्वी सातारा- स्वारगेट मार्गावर सुमारे 35 फेऱ्या सुरू होत्या. मात्र, लॉकडाउननंतर केवळ दहा ते बारा फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या. एसटीच्या कमी फेऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आता पुण्याला जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने दर 30 मिनिटांनी बस सुरू करण्यात आली आहे.
सातारा- बोरिवली मार्गावरही बसच्या फेऱ्या दर दोन तासांनी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या पाहता या मार्गावर दर एक तासाला एसटी बस सोडली जात असल्याचे एसटी विभागाने सांगितले आहे.