सातारा शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर


स्थैर्य, 19 मार्च, सातारा : गेले दोन दिवस आभाळ आणि कुंदवातावरणाने तसेच वाढत्या उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या सातारकरांना आज दुपारी मात्र पहिल्या पावसाचा गारवा आनंद घेता आला गुढीपाडव्याला दुपारी दोन पासून हा रिमझिम पाऊस मेघगर्जनेसह काही वेळ जोराचा सुरू झाला आणि त्याच वेळी वीज कंपनीने हे औचित्य साधून परिसरातील वीज गायब केली .त्यामुळे घरामध्ये गुढीपाडव्याच्या सुट्टीचा आनंद घेणार्‍या तमाम सातारकरांना मात्र उकाड्याने हैराण केले .या अवकाळी पावसामुळे परिसरातील आंबा उत्पादक तसेच काढणीला आलेल्या गहू पिकाला मोठा फटका बसला असून अनेक झाडावरील कैर्‍या गळून पडल्याचे मोठे नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागल्याचे चित्र दिसून येत होते. अवकाळी पावसाचा हा अंदाज हवामान खात्याने गेले तीन दिवस वर्तवला होता .  सातारा शहर परिसरात गुरुवारी दुपारपासून सुरू झालेला हा हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस थोडासा हवेत गारवा निर्माण काढल्या करणारा ठरल्याचे चित्र दिसून येत होते .

फलटण, माणमध्ये अवकाळी पावसासह गारपीट

माण व फलटण तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसासह गारपीट झाली. सुमारे अर्धा ते एक तास झालेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. काही ठिकाणी वार्‍यासह जोरदार सरी कोसळल्या, तर गारपीट झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.माण तालुक्यातील काही गावांमध्ये शेतातील पिकांना किरकोळ फटका बसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, तर फलटण तालुक्यातही काही भागांत गारांचा वर्षाव झाल्याने रस्ते व शेत परिसरात गारांचा थर साचलेला दिसून आला.
अचानक बदललेल्या हवामानामुळे बाजारपेठेत असलेल्या नागरिकांनी आसरा शोधला. दरम्यान, पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

माण तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागासह अनेक ठिकाणी बुधवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत सर्वांचीच त्रेधातिरपीट उडवली. अचानक आलेल्या या पावसामुळे सुगीच्या कामात गुंतलेल्या शेतकर्‍यांची मोठी पळापळ झाली. शेतात काढणीसाठी तयार असलेला गहू, हरभरा यांसारखी पिके भिजू नयेत, यासाठी शेतकर्‍यांनीआटोकाट प्रयत्न केले. मात्र, अनेक ठिकाणी जनावरांचा चारा (कडबा) भिजल्याने नुकसान झाले, तसेच द्राक्षे, डाळिंबाची कळी यांसारख्या नगदी पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला.
शिखर शिंगणापूर, मोही, खुटबाव, डंगिरेवाडी, सोकासन, राणंद, गोंदवले खुर्द, वावरहिरे, वडगाव, कोकरेवाडी, शेवरी, बल्लाळवाडी आदी गावांमध्ये वादळी वार्‍यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला. या उन्हाळ्यातील गारांचा हा पहिलाच अनुभव होता. अनेक ठिकाणी गारांची पांढरीशुभ्र चादर पसरली होती. तालुक्यातील शेतकर्‍यांनी ज्वारी, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांची काढणी सुरू केली असताना गारपीट झाल्याने नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सायंकाळच्या सुमारास अचानक गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुकुडवाड, वडजल, पळशी, ढाकणी तसेच परिसरातील गावांमध्ये गारपीट झाली, तर वळई येथे पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतशिवारातील कापणी करून ठेवलेले गहू, ज्वारीचा कडबा, मका आणि हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणावर पसर पडली. त्यामुळे शेतकर्‍यांची एकच धांदल उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
फलटण तालुक्यातील गिरवी व धुमाळवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे चार ते पाचच्या दरम्यान 15 मिनिटे गारपिटीसह हलका पाऊस झाला. त्यामुळे या भागातील फळबागांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे, तसेच ढवळ, वाखरी, ताथवडा आणि सासवड परिसरातही पावसाने हजेरी लावली.

गेल्या आठवड्यापासून तालुक्यात तापमान 36 अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेचा तडाखा जाणवत असतानाच अचानक हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर काही भागात गारपिटीसह हलका पाऊस झाला. गिरवी व धुमाळवाडी परिसरात आंबा, अंजीर, डाळिंब, द्राक्षे आणि पेरू या फळबागांचे मोठे क्षेत्र आहे. गारपिटीमुळे फळबागांची पाने व कळ्यांची गळती, आंब्याच्या कैर्‍या पडणे तसेच फळांवर डाग पडण्याची शक्यता आहे. आधीच निर्यातीत अडचणी निर्माण झालेल्या असताना गारपिटीचा फटका बसल्यास फळ उत्पादकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!