दैनिक स्थैर्य | दि. २९ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण शहर व तालुक्यात ठीकठिकाणी काल पावसाने चांगली हजेरी लावली. या पडलेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे फलटण तालुक्याला काही काळ तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला.
मागील काही दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळीशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने दोन दिवसांपासून लावलेल्या दमदार हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परवा काही काळ, काल सकाळी आणि दुपारी पावसाने मध्यम स्वरूपात हजेरी लावली.
मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ होत होती. पावसामुळे तापमान कमी झाले आहे. पावसामुळे काल वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. या पावसामुळे कोठेही नुकसान झाल्याचे आढळून आलेले नाही.