दैदिप्यमान स्वरुप प्राप्त झालेला वारीचा सोहळा रद्द हे अभूतपूर्व संकट : बंडा महाराज कऱ्हाडकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : सन १८३२ मध्ये म्हणजे सुमारे १८८ वर्षापूर्वी १००/२०० लोकांच्या सहभागाने सुरु झालेला माऊलींचा दैदिप्यमान पालखी सोहळा आज ३ लाखाहुन अधिक लोकांचा सहभाग असलेला हा सोहळा,  एवढया मोठया संख्येने एकत्र येऊन सर्व समाज गुण्यागोविंदाने एकत्र चालतो, त्याचे दररोजचे व्यवस्थापन आखीव रेखीव असते याचे देशातीलच नव्हे जगभरातील लोकांना कुतुहल वाटते, त्याबद्दल ते आश्चर्य व्यक्त करतात असा हा सोहळा यावर्षी रद्द करावा लागल्याबद्दल सर्वानाच दुःख झाल्याची भावना युवक मित्र, ह. भ. प. बंडा तात्या कऱ्हाडकर यांनी बोलून दाखविली आहे.

ह. भ. प. बंडा तात्यांचे मार्गदर्शनाखाली पिंप्रद, ता. फलटण येथे संत ज्ञानेश्वर गोपालन व संशोधन संस्था, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे मध्यवर्ती कार्यालय आणि ह.भ.प. ,भगवान मामा कऱ्हाडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत विद्यालय (निवासी) गुरुकुल धर्तीची शाळा चालविण्यात येत असून लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांचे गेल्या दोन अडीच महिन्यांपासून त्यांचे वास्तव्य येथे असल्याने त्यांची भेट घेऊन पालखी सोहळ्याच्या संबंधी त्यांच्याशी चर्चा केली असता, सोहळा नाही ही कल्पनाच मनाला मोठया वेदना देणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण जगाला वेड लावणारी पंढरीची ही वारी महाराष्ट्रीय संस्कृतीचा मानबिंदू मानावी लागेल, आषाढी एकादशी आणि वारी याचे वेध वारकऱ्यांना दोन महिन्यांपासून लागतात, सामुहिक उपासनेची सुलभता या वारीत जाणवते, ‘ज्ञानोबारायांसारखा योगी, माझे जिवीचे आवडी’ म्हणून गुढी खांद्यावर घेतो तर ‘खट नट यावे, शुद्ध होवोनी जावे’ अशी दवंडी चोखोबा भावाने पिटतात.

देवाकडे जाताना वाहनावर बसून जाऊ नये हा शिष्टचार या पायी वारीचे मागे असल्याचे सांगत मुळात दिंडीची ही संकल्पना पुंडलिक रायांचे काळापासून म्हणजे सुमारे ५ हजार वर्षापासूनची आहे, ७०० वर्षापूर्वी भक्त शिरोमणी नामदेवरायांनी या उपासनेला समाज पातळीवर आणून, नाचू कीर्तनाचे रंगी चा आदेश दिल्याचे नमूद करीत ‘टाळ घोळ चिपळी यांचा नाद, दिंड्या पताका मकरंद घेऊन जाईसगे माया तया पंढरपूरा’ अशी संकल्पना ज्ञानोबारायांनी निर्माण केली तर ‘तुका झालासे कळस’ या पात्रतेने तुकोबारायांनी १४०० वारकऱ्यांसह ही वारी करुन विक्रम केल्याचे ह.भ.प. बंडा महाराज कऱ्हाडकर यांनी निदर्शनास आणून दिले.

तुकोबारायांचे पश्चात अवघा समाज दिशाहीन झाला, त्या समाजाला आधार व धीर देण्याचे काम महाराजांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराजांनी केल्याचे सांगताना, त्यांनी देहुतून आळंदी मार्गे जाऊन ज्ञानोबारायांच्या पादुका पालखीत घेऊन ज्ञानोबा तुकाराम हा महामंत्र वारकऱ्यांना दिल्याचे नमूद करीत रामकृष्ण हरी हा आमचा बीज मंत्र आहे, तर ज्ञानोबा तुकाराम हा महामंत्र असल्याचे ह.भ.प. बंडा महाराज कऱ्हाडकर यांनी स्पष्ट केले.

या सोहळ्यात ज्ञानेश्वर माऊली भक्त हैबतबाबा आरफळकर चालत असत त्यावेळी सन १८३१ मध्ये देहुकरांचे आपसातील वादामुळे त्यावर्षी सोहळा निघाला नाही, त्याचे दुःख हैबतबाबांना झाले व त्यांनी सन १८३२ मध्ये ज्ञानोबारायांचा स्वतंत्र सोहळा सुरु केला. त्यावेळी हैबतबाबांना व्यवस्थापनाचे सहकार्य अंकलीचे शितोळे सरकार यांनी, तर भजनाची बाजू वासकर यांनी सांभाळल्याचे नमूद करीत त्यावेळी सोहळ्याचे आघाडीवर शितोळे सरकारांचा हत्ती असे मात्र पुढे हत्तीची देखभाल व चाऱ्याची व्यवस्था पुरेशी होत नसल्याने हत्तीची जागा घोड्यांनी घेतली त्यामध्ये पुढे चालणारा मोकळा घोडा माऊलींचा मानला जात असल्याचे ह.भ.प. बंडा महाराज कऱ्हाडकर यांनी सांगितले.

दैदिप्यमान असणारा हा सोहळा यावर्षी बंद राहिला हे वारकरी सांप्रदायावरील अभूतपूर्व संकट असल्याचे नमूद करीत घरी खाणे पिणेस असो नसो, प्रपंच होवो न होवो वारीच्या ओढीने ज्येष्ठ वद्य आष्टमीस नियमीतपणे येणारा वारकरी यंदा करोनाच्या आपत्तीमध्ये सापडला आणि ‘नको नको हा वियोग, कष्ट होताती जीवाशी’ अशा विरहात पडला आहे, वास्तविक काही झाले तरी वारी चूको न दे हरी या अपेक्षेचा वारकरी वारी चुकल्याचे दुःख भोगतो आहे, शासनाने घेतलेल्या वारी बंदीचा कठोर निर्णय आमचे जिव्हारी लागला तथापी या आजाराचे उत्तरोत्तर वाढते उग्र स्वरुप पाहता याला पर्याय नसल्याचे सुज्ञ वारकरी जाणतात असे सांगून असा प्रसंग पुन्हा कधीही येऊ नये ही प्रार्थना पंढरीनाथाला करणे एवढेच आपल्या हाती असल्याचे यावेळी ह.भ.प. बंडा महाराज कऱ्हाडकर यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण वारकरी समाजावर हा दुःखद प्रसंग आला आहे, परंतू समाजहित ध्यानी घेऊन आपल्या श्रद्धेला मुरड घालणे आपले नैतिक कर्तव्य आहे. आपापल्या गावी असणारा पंढरीराजा पंढरी सोडून आपल्यासाठी धावून आला आहे या दृढ श्रद्धेने अंत:करणावर दगड ठेवून आपण यावर्षी वारी गावीच साजरी करु, शासनाचे या निर्णयास सहकार्य करावे असे आवाहन युवक मित्र ह.भ.प. बंडा महाराज कऱ्हाडकर यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!