
दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील सासकल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध, एकमताने करण्यात आली. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिनियम २००९ मधील तरतुदीप्रमाणे मागील शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल समाप्त झाल्याने नवीन समितीची निवड प्रक्रिया पार पाडली. मागील शाळा व्यवस्थापन समितीमधील या समितीचे अध्यक्ष दीपक भानुदास घोरपडे व तत्कालीन सर्व सदस्यांचे चांगले काम केल्याबद्दल व नवीन शाळांच्या मंजूर इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लावून प्रशस्तवर्ग खोल्यांचे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बहुतांशी पालक उपस्थित होते.
सन २०२४- २०२५ ते सन २०२५-२०२६ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून संदीप अशोक मुळीक तर उपाध्यक्षपदी दिनेश दत्तात्रय मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षक प्रतिनिधी म्हणून पांडुरंग निकाळजे यांची तर शिक्षणतज्ज्ञ म्हणून अतुल सुभाष मुळीक यांची निवड करण्यात आली.
समितीच्या सदस्यपदी अनिल मुळीक, निकिता दीपक घोरपडे, संदीप फडतरे, संगीता पोपट खोमणे,दिपाली निलेश चांगण, रविना सागर देवघरे,शंकर मुळीक, धैर्यशील दळवी, अमृता वैभव कवितके,चंदन कोळी, वैशाली मुळीक, नामदेव मुळीक यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल गावच्या सरपंच उषा फुले, उपसरपंच राजेंद्र घोरपडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा सुधारक संघटन, सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थांनी नवीन शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ, पदवीधर शिक्षक पांडुरंग निकाळजे, सुधीर ढालपे, रुपाली शिंदे, कीर्ती निकाळजे, संध्या गोरे आदी शिक्षक उपस्थित होते.