
दैनिक स्थैर्य | दि. ०३ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन गेली ३२ वर्षे पतसंस्थांची नेतृत्व करणारी राज्य पातळीवरील शिखर संस्था आहे. या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्यानंतर झालेल्या बैठकीत पतसंस्था चळवळीत आणि सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन जयकुमार शिंदे यांची राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसे पत्र पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन काकासाहेब कोयटे यांनी शिंदे यांना दिले आहे.
दरम्यान, जयकुमार शिंदे हे राज्य फेडरेशनवर दुसर्यांदा काम करत आहेत. पतसंस्थांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन सलग दुसर्यांदा त्यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी राज्य फेडरेशनचे चेअरमन काकासाहेब कोयटे यांनी दिली आहे. त्यांच्या या निवडीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपचे जिल्ह्याध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार भारतीचे उदय जोशी, राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक डॉ. रवींद्र भोसले, संचालक विनोद कुलकर्णी व इतर अनेकांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.