दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । मुंबई कॉरिडॉर प्रकल्प जिल्ह्यात कुठे राबवायचा हा अंतिमत: केंद्र सरकारचा निर्णय आहे. असे असताना केंद्रात सत्तारुढ असलेल्या पक्षाचेच आमदार असूनही हा प्रकल्प स्वत:च्या मतदारसंघात मंजूर करुन घेण्यात अपयशी ठरणारे स्वत:चे पाप लपवण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर विनाकारण टिका करत आहेत. त्यांच्या या बिनबुडाच्या आरोपांचा राजे गटाकडून तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे राजे गटाचे कट्टर समर्थक प्रीतसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केले.
नियोजित बेंगलोर – मुंबई कॉरिडॉर प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्प म्हसवड ला न होता उत्तर कोरेगावमध्ये होण्यासाठी हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर माणचे आमदार विनाकारण यामध्ये श्रीमंत रामराजे यांना बदनाम करत आहेत. मुळात ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्याच पक्षाची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना आपल्या मतदार संघात येऊ घातलेला प्रकल्प दुसर्या मतदार संघात जातो की काय ? या स्वत:च्या अपयशाचे खापर श्रीमंत रामराजे यांच्यावर फोडण्याचा राजकीय डाव ते खेळत आहेत. यासाठी मुठभर कार्यकर्त्यांना उस्कावून त्यांच्याकडून श्रीमंत रामराजे यांच्याविरोधात आंदोलनाचा फ्लॉप शो हे ते घडवून आणत आहेत. या सगळ्या प्रकाराचा राजे गटाकडून निषेध व्यक्त केला जात असून माणच्या आमदारांनी आपले डर्टी पॉलिटीक्स थांबवावे अन्यथा राजे गटाकडूनही जशास जसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही प्रितसिंह खानविलकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.