स्थैर्य, मुंबई, दि.२९: फिजिकल डिस्टन्सिंगसह कोरोनाचे सर्व नियम पाळून लवकरच आता हॉटेलिंगचा आनंद लुटता येणार आहे. मार्गदर्शक तत्त्वे अंतिम झाल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हॉटेलिंगसाठी मुभा मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांना तसा शब्द दिला. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूरच्या हॉटेल व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने राज्याने काही पावले टाकायला सुरुवात केली आहे. काही व्यवहार बंद ठेवल्याने कररूपात शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. त्या दृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात आली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. रेस्टॉरंट व्यावसायिकांची पुन्हा बैठक घेऊन एसओपी अंतिम करू, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.
बैठकीस रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलीप दतवाणी, रियाझ अमलानी, प्रणव रुंगठा, सुकेश शेट्टी, एस. के. भाटिया उपस्थित होते.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत ग्राहकांच्या बसण्याच्या जागा, निर्जंतुकीकरण, ग्राहकांचे तपमान मोजणी, मास्क वापराची सक्ती यासंदर्भातल्या अटी एसओपीमध्ये असतील. त्या आम्हाला मान्यच आहेत. रेस्टॉरंट व्यावसायिक अटींचे तंतोतंत पालन करतील, अशी ग्वाही राष्ट्रवादी हॉटेल व्यावसायिक संघटनेचे विश्वास शेट्टी यांनी दिली. हॉटेल व्यावसायिकांनी ८ सप्टेंबर रोजी शरद पवार यांची भेट घेतली होती. पवार यांनी त्यांना मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. ९ सप्टेंबरला हॉटेल व्यावसायिकांशी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. तरी हॉटेल्सना परवानगी मिळालेली नव्हती.