
दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । सातारा । वेचले (ता. सातारा) येथील जावळे वस्तीनजीक साठविलेले विना परवाना लाकूड वन विभागाने जप्त केले. या वेळी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे दहा लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेचले गावानजीक असलेल्या जावळे वस्तीत सागवान व रायवळचे लाकूड मोठ्या प्रमाणात साठविण्यात आले होते. त्यानंतर या विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा रियाज पालकर (रा. सातारा) यांचे विनापास परवाना साठविलेले अवैध लाकूड आढळून आले. घटनास्थळावरुन लाकूड माल तसेच ते भरुन ठेवण्यात आलेले
ट्रॅक्टर (क्रमांक एमएच 09 बीपी 4273) तसेच ट्रॉली (क्रमांक एमएच 11 सीक्यू 4281) अशा वाहनांसह एकूण सुमारे दहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक महादेव मोहिते उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक (वनीकरण) सुधीर सोनवले, वन परिक्षेत्र अधिकारी निवृती चव्हाण यांनी ही कारवाई केली. त्यात वन परिमंडळ अधिकारी तसेच ठोसेघर, भरतगाव, रोहोट, धावली, पळसावडे, खडगाव येथील वनरक्षक सहभागी झाले.