
स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑगस्ट : ढवळ (ता. फलटण) येथे अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाळू आण्णा बनकर (वय ६५, रा. ढवळ) हे दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून ढवळपाटी येथून घरी जात होते. एस.टी. स्टँडसमोर आले असता, पाठीमागून आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत बनकर रस्त्याच्या कडेला फेकले गेले आणि त्यांच्या डाव्या खुब्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वाहनचालक आपले वाहन घेऊन पळून गेला. बनकर यांना उपचारासाठी फलटण येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, त्यांच्या खुब्याचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले.
बाळू बनकर यांनी हॉस्पिटलमधून दिलेल्या जबाबानुसार, अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू गरडे करत आहेत.