
वाठार निंबाळकर (ता. फलटण) गावच्या हद्दीत साईरत्न हॉटेलजवळ सायकलवरून जाणाऱ्या एका वृद्धाला अज्ञात चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या पुण्यात उपचार सुरू आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. 3 मार्च : वाठार निंबाळकर (ता. फलटण) गावच्या हद्दीत वाठार निंबाळकर फाटा ते फलटण रस्त्यावर साईरत्न हॉटेलच्या जवळ सायकलवरून जाणाऱ्या एका वृद्धाला अज्ञात चारचाकी वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात सायकलस्वार वृद्ध गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खिशातील चिठ्ठीमुळे मिळाली अपघाताची माहिती
हणमंत हरिभाऊ घोरपडे (रा. कांबळेश्वर, ता. बारामती, जि. पुणे, सध्या रा. भडकमकर नगर, फलटण) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर सुरेश फडतरे (वय ४० वर्षे, मूळ रा. फडतरवाडी, सध्या रा. भडकमकर नगर, फलटण) यांचे सासरे हणमंत घोरपडे हे गेल्या एक वर्षापासून त्यांच्यासोबत फलटण येथे राहत आहेत. दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हणमंत घोरपडे हे त्यांच्या सायकलवरून आळजापूर या ठिकाणी गेले होते. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने फिर्यादी सागर फडतरे यांना फोन करून माहिती दिली की, वाठार निंबाळकर फाट्याच्या पुढे एका व्यक्तीचा अपघात झाला असून त्यांच्या खिशातील चिठ्ठीवर तुमचा मोबाईल नंबर लिहिलेला आहे.
अज्ञात चारचाकीची पाठीमागून धडक
ही माहिती मिळताच सागर फडतरे यांनी तत्काळ वाठार निंबाळकर फाट्याच्या अलीकडे असलेल्या ‘सायरन’ हॉटेलजवळ धाव घेतली असता, तिथे मोठी गर्दी जमली होती. गर्दीतून आत जाऊन पाहिले असता त्यांचे सासरे हणमंत घोरपडे हे गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेले दिसले. ते वाठार निंबाळकर फाट्यावरून फलटणकडे येत असताना त्यांच्या सायकलला पाठीमागून अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याचे तिथे उपस्थित लोकांनी सांगितले.
पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू
अपघातानंतर जखमी हणमंत घोरपडे यांना ॲम्ब्युलन्समधून तातडीने फलटण येथील साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना पुढील उपचारांसाठी बारामती येथे नेण्यास सांगितले. बारामती येथील हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार केल्यानंतर, त्यांना अधिक उपचारांसाठी पुणे येथील नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी सासऱ्याला धडक देऊन जखमी करणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध सागर फडतरे यांनी २८ फेब्रुवारी रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

