सामाजिक सहिष्णुतेसाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । औरंगाबाद । मराठवाडा ही सामाजिक क्रांतिकारी परिवर्तनाची भूमी आहे. याच भुमितील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शिक्षणाबरोबरच सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता अबाधित राखण्यासाठी मार्गदर्शक काम करावे,असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण आणि पद्म पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले होते. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यास कुलगुरु प्रा. डॉ.प्रमोद येवले, कुलसचिव प्रा. डॉ. भगवान साखळे, तसेच पद्मपुरस्कार प्राप्त  मान्यवर शब्बीर सय्यद, गिरिश प्रभुणे, दादासाहेब इदाते, रमेश पतंगे, डॉ. प्रभाकर मांडे यांच्या समवेत कृषीतज्ज्ञ श्रीरंग लाड उपस्थित होते. कार्यक्रमास प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थित पद्मपुरस्कार प्राप्त मान्यवरांचा श्री. कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यात फातेमा झकेरीया यांच्या वतीने फरहद जमाल यांनी तर डॉ. यु.म. पठाण यांच्या वतीने आतिक पठाण व श्रीमती अलमास पठाण यांनी तर डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या वतीने डॉ. निवेदिता पानतावणे यांनी सत्कार स्वीकारला.

उपस्थितांना संबोधित करतांना श्री. कोविंद म्हणाले की, महाराष्ट्र ही देशाच्या सामाजिक चळवळीची भूमि आहे. याशिवाय देशासाठी सामाजिक,आर्थिक योगदान देण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. भारतीय संस्कृतित या भूमिचे योगदान अतुलनीय आहे. संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सदैव शिक्षणाला प्राधान्य दिले. या देशासाठी योगदानात संविधानाची निर्मिती करतांना तत्कालिन विविध भुमिकांना छेदत आपण प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहोत ही ठाम भुमिका स्विकारली. त्यांची ही भुमिका राष्ट्रभावना रुजविण्यासाठी उपयुक्त ठरली. त्यातूनच आजच्या देशाची जडण घडण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आपली भारतीय संस्कृती प्राचीन असतांनाच आपण जगात सर्वात जास्त युवकांचा देश आहे. या युवा शक्तीचे राष्ट्र विकसित करण्यासाठी योगदान घेण्यासाठी शिक्षण हेच महत्त्वाचे माध्यम आहे. त्यासाठी देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. या धोरणाचा उद्देश हा राष्ट्र विकसित करणे हाच आहे. शिक्षणाचे अंतिम ध्येय्य हे चांगला माणूस घडविणे हेच आहे. शिक्षण घेतलेला व्यक्ति तो ज्या क्षेत्रात कार्य करतो ते चांगले कार्य करतो. विद्यापीठाने आपल्या संशोधन कार्यातून राष्ट्राच्या उन्नत्तीला चालना द्यावी,असे आवाहनही त्यांनी केले. पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सन्मान केल्याने विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्याकडूनही भविष्यात देशासाठी चांगले कार्य घडावे, अशा शुभेच्छा ही त्यांनी दिल्या.

श्री. कोविंद यांच्या हस्ते प्रथम विद्यापीठाच्या नुतनीकरण केलेल्या प्रवेशद्वाराचे लोकर्पण कोनशिला अनावरणाने करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

प्रास्ताविक कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केले. याप्रसंगी पद्मपुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपले  मनोगतही व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. मुन्तजीब खान व डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी केले.

 


Back to top button
Don`t copy text!