गावाच्या विकासासाठी एकोपा व सहकार्य महत्वाचे – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.९ मे २०२२ । सातारा । गावाच्या विकासात एकोपा व सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. हे वाढे गावाने दाखून दिले असून गावात चांगल्या प्रकारे विकास कामे झाली आहेत. याचा आदर्श इतर गावांनी घेऊन गावातील गट-तट विसरुन व सर्वांच्या सहकार्यातून गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वाढे ता. जि. सातारा येथील सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सूचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत 1 कोटी 5 लाखाच्या मिळालेल्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित सभेत श्री. पवार बोलत होते. या प्रसंगी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार कांताताई नलावडे, वाढे गावचे सरपंच संदेश देखणे, सदस्या मेघा नलावडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, सातारा जिल्ह्याला एक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. या जिल्ह्याने अनेक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळविले आहेत. गेल्या दोन वर्षापासून सर्वजण कोरोना संकटातून गेलो आहोत. या संकटाच्या काळात अनेकांनी चांगले काम केले. कोरोना संसर्गामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. रोजगाराच्या संधी वाढविण्यावर शासनाने भर दिला आहे. शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून रुपये 50 हजार पर्यंत लाभ देण्यात येणार असल्याचे सन 2022 च्या अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. याचाही नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उत्तम दर्जाचे बियाणे, खत तसेच कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केले जात आहे.

सातारा येथील सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधांसाठी 300 कोटींची तरतुद तसेच जावली तालुक्यात जलपर्यटन प्रकल्पासाठी 50 कोटी व महाबळेश्वर पर्यटन विकासासाठी 100 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. नायगांव, ता. खंडाळा येथील सावित्रीबाई फुले विद्यालय, नायगाव या गावांतील शाळांना शैक्षणिक सुविधा सुधारणांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून यापुढे विकास प्रक्रिया अधिक गतीने राबविण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनामुळे राज्याच्या महसूलात मोठी तुट निर्माण झाली असतानाही राज्य शासनाने नागरिकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देवून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला. शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. शासनाने गेल्या दोन वर्षात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प व रस्त्यांचे काम पूर्ण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. जिल्ह्यातील विकास कामांना आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास वाढे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!