
स्थैर्य, फलटण : जर करायचं ठरवलं तर व्यक्ती काहीही करू शकतो हे सिध्द केले आहे एका तरुण शेतकऱ्याने, शेती व्यवसायाला जोड व्यवसायांचा हातभार असला की उत्पादनात वाढ होते. परंतु शेळीपालन, दुग्धव्यवसाय यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो चारा आणि दुष्काळी भागात पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा लागवडीसाठी जमिनीचा अभावामुळे अनेक संकटाना सामोरे जावे लागत असते. कमी जागेत, कमी खर्चात, कमी वेळात मातीविना चाऱ्याचे उत्पादन करू शकतो. जगदंब हाइड्रोफोनिकस सिस्टिमचे विशाल माने आणि त्यांची कंपनी लोकांसाठी जणू वरदानच ठरत आहे. याचा आढावा कृषि महाविद्यालय पुणेची विद्यार्थिनी कु. सिद्धी फरांदे हिने घेतला आहे.
वनस्पती रोगशास्त्र विभागाचे केंद्रप्रमुख डॉ. हसबणीस, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुर्यवंशी आणि विषयप्रमुख डॉ. सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या कु. सिद्धी फरांदे हिने घेतला.
वडिलांची छत्रछाया नसताना माने याने खूप कामी वयात मोठे यश संपादन केले आहे. इंजिनिअरिंगची पदवी घेत असतानाच त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची कल्पनसुद्धा होती. नोकरी करायची नाही, आपण व्यवसाय करून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देऊ अशी इच्छा मनात होती. पण व्यवसाय करायचा कशाचा ? मग शेळीपालन करूयात असे त्यांच्या मनात आले. पण त्यासाठी स्वतःची शेती नव्हती मग त्यांनी या विचारावर भर दिला की आपण मातीविरहित चारा बनवु शकतो का ? या व्यवसायाची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली. तसेच चाऱ्याचा फायदा आणि ग्राहक अशा सर्व बाबींचा विचार करुन त्यांनी हा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. घरातल्यांचा विरोध असून सुद्धा त्यांनी कोणतेही भांडवल उपलब्ध नसताना मित्रांच्या मदतीने व्यवसायाला छोट्या प्रमाणावर सुरुवात केली. अनुभव मिळवण्यासाठी त्यांनी स्वतः कंपनी मध्ये काम केले. मग चारा बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज लागते. हे त्यांना समजले म्हणून त्यांनी चारा उगवण्यासाठी लागणारे सेट अप साधनसामग्री उभे करून देण्यासाठी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जगदंब हायड्रोफोनिक्सची उभारणी केली. त्यांना पाहिली ऑर्डर पुसेगाव मध्ये मिळाली पण खर्च वजा करुन हातात फक्त २००० रू शिल्लक राहिले. पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यामुळे व्यवसायाबद्दल चा कुटुंबातील लोकांचा नकार अजूनच वाढला तरीही त्यांनी प्रवास सुरूच ठेवला. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडून व्यवसायावरच पूर्ण लक्ष कंद्रित केले. त्यानंतर त्यांच्या या व्यवसायाची माहिती देण्यासाठी ते अनेक ठिकाणी फिरले. मग त्यांना ऑर्डर्स मिळायला सुरूवात झाली. यानंतरच्या ऑर्डर्स मध्ये त्यांना बऱ्यापैकी नफा होयला लागला. असाच त्यांचा व्यवसाय अनेक ठिकाणी पसरत गेला व त्यांना नंतर अनेक ऑर्डर महाराष्ट्रच्या बाहेरून गुजरात, वाराणसी, आसाम येथून मिळाल्या. ते स्वतः जाऊन चारा उगवण्यासाठी लागणारे सेट अप व मार्गदर्शन करतात. तसेच सेंद्रिय पद्धतीने चारा उगवण्यासाठी देखील ते मार्गदर्शन करतात. असेही कु. सिद्धी फरांदे हिने स्पष्ट केले.