दैनिक स्थैर्य । दि. ०४ मे २०२२ । फलटण । शुक्रवार पेठ (सणगर गल्ली) येथील युवक गणेशोत्सव मंडळाने शिवजयंतीनिमित्ताने ‘पावनखिंड’ या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचे प्रसारण करुन छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन केले. वैशाख शुद्ध द्वितीयेला परंपरेनुसार शिवजयंती साजरी करण्याची फलटणला प्रथा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दोन वर्षांनी सार्वजनिक स्वरुपात साजर्या होणार्या यंदाच्या शिवजयंतीला फलटणकरांमध्ये मोठा उत्साह होता.
सणगर गल्ली येथील युवक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील याच उत्साहात परिसरातील बाल – चमूंसह नागरिकांमध्ये आपल्या अभिमानास्पद इतिहासाची जागृती व्हावी या उद्देशाने अनोखा उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित; घोडखिंडीचा इतिहास दाखवणार्या ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाचे प्रसारण शिवजयंतीच्या पूर्व संध्येला प्रोजेक्टरद्वारे सणगर गल्ली येथे करण्यात आले. मंडळाच्या या उपक्रमाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले.
या उपक्रमासाठी मंडळाचे मार्गदर्शक पै.पप्पू शेख, गणेश उर्फ बंटी हाडके, प्रीतम धुमाळ यांचे विशेष सहकार्य लाभले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय चवंडके, साजेब आतार, सनी औरंगे, दिलीप चवंडके, एकनाथ चवंडके, ऋषकेश खुळपे, मंगेश चवंडके, राजेश सोनवणे, शिवम बामणे, दर्शन चवंडके, काब आतार, लखन जमदाडे, प्रमाद जमदाडे, आनंद बामणे, प्रसाद चवंडके, जुनेद आतार, वरद औरंगे, अमोल जाधव यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.