
स्थैर्य, शिंदेवाडी, दि. ३ सप्टेंबर : फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील कुमारी वैदिका आणि कुमारी वैभवी या भगत भगिनींनी साकारलेली गौरीची आरास सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे. पारंपरिक पितळी भांडी आणि घरातील दुर्मिळ, जुन्या वस्तूंचा वापर करून केलेल्या या अनोख्या सजावटीमुळे ‘जुनं तेच सोनं’ या म्हणीची प्रचिती येत असून, ही आरास पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे.
या सजावटीमध्ये घरातील जुन्या काळातील पितळी भांडी आणि इतर घरगुती वस्तूंचा अतिशय कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. ही सजावट पाहिल्यानंतर अनेक ज्येष्ठ महिला आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. भगत भगिनींच्या या संकल्पनेचे आणि सुंदर मांडणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सजावटीसाठी त्यांना आदित्य भगत यांनी मदत केली.
कुमारी वैदिका आणि वैभवी या फलटण तालुक्यातील प्रसिद्ध नाणी संग्राहक व अभ्यासक श्री. सचिन भगत आणि श्री. समीर भगत यांच्या पुतण्या आहेत. भगत कुटुंबाने अनेक वर्षांपासून हा ऐतिहासिक आणि पारंपरिक वस्तूंचा ठेवा जपला असून, त्याच वस्तूंचा वापर या गौरी सजावटीत केल्याने तिला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या परंपरेशी जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न या भगिनींनी केला आहे.