स्थैर्य, नवी दिल्ली, 21 : एका अनोख्या उपक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उद्या म्हणजेच 22 मे 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजता देशातील कम्युनिटी रेडिओशी संवाद साधणार आहेत. एकाच वेळी देशातील सर्व कम्युनिटी रेडिओ स्टेशनवर हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.
ही चर्चा हिंदी आणि इंग्रजी या दोन विभागांत प्रसारित केली जाईल. श्रोते एफएम गोल्ड (100.1 MHz) वर हिंदीमध्ये सायंकाळी 7:30 वाजता आणि इंग्रजीत रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी हा कार्यक्रम ऐकू शकतात.
कोविडशी संबंधित संवादासाठी सरकार देशातील सर्व विभागांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. देशात सुमारे 290 कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहेत आणि एकत्रितपणे ते तळागाळातील लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करतात. भारतातील दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या शक्तीचा उपयोग करण्याच्या उद्देशाने ही चर्चा आयोजित केली आहे.
प्रथमच केंद्रीय मंत्री कम्युनिटी रेडिओ स्टेशनच्या श्रोत्यांना एकाच वेळी संबोधित करणार आहेत. या संवादादरम्यान ते कम्युनिटी रेडिओ स्टेशनकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही देतील.