दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या व राज्य शासनाच्या योजना गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्रीय आणि राज्य पातळीवरील योजनांची जनजागृती करण्यासंदर्भात मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते.
सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांगजन, ओबीसी, अनाथ, वयोवृध्द, तृतीय पंथीय या सर्वांचा समावेश असलेले मंत्रालय आहे. या सर्व घटकांच्या कल्याणासाठी मंत्रालयाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्यासाठी सरकारच्या वतीने योग्य प्रमाणात निधीची तरतूदही करण्यात येत आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री श्री.आठवले म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री श्री.आठवले म्हणाले,समाजातील या वर्गांसाठी एक विधायक कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून होत असून सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी, या योजनांची जागृती करण्यासाठी, मंत्रालयाचे विविध विभाग स्तुत्य उपक्रम राबवत आहेत. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन, योजनांची माहिती देणारी छापील पुस्तके, योजनांसंदर्भात सादरीकरण अशा विविध माध्यमातून होत असलेले प्रयत्न आणि या प्रयत्नांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद कौतुकास्पद आहे, असे त्यांनी नमूद केले. योजनांच्या जनजागृती बरोबरच त्यांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी देखील सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मंत्रालयाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे. गेल्या वर्षी या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून 75 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री श्री.आठवले यांनी दिली. सामाजिक न्याय मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वृद्धाश्रम’ योजना सुरु केली असून प्रत्येक जिल्ह्यात एक वृद्धाश्रम देण्याचा सरकारचा विचार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे नशा मुक्ती केंद्र, आंतरजातीय विवाह, यासंदर्भातील योजनांचाही उल्लेख करुन सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री श्री.आठवले यांनी यावेळी लाभार्थींना केले.