दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । पुणे । पुणे ते बंगळुरू हा नवीन हरित महामार्ग (प्रवेश नियंत्रण) बांधला जात आहे. फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू असा हा मार्ग जाईल, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे येथील समारंभादरम्यान केली.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कात्रज येथे महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
देशातील महामार्ग निर्मितीसाठी आधुनिक आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यापूर्वीच दिलेले आहेत. त्याअनुषंगाने होणारा हा नवीन हरित महामार्ग फलटणहून जात असल्याने फलटणच्या विकासात आणखीन भर पडणार आहे.
दरम्यान, पुणे – पंढरपूर पालखी मार्गाचा आढावा घेताना ना.नितीन गडकरी यांनी माहिती दिली की, ज्ञानेश्वर पालखी मार्ग सहा पॅकेजचा, 234 किमी आणि 6710 कोटीचा असून पैकी 3 पॅकेज वर काम सुरू झाले आहे.
हे दोन्ही मार्ग प्रत्यक्षात सुरु झाल्यानंतर फलटणला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.