
स्थैर्य, फलटण, दि. 10 सप्टेंबर : श्री सद्गुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्था आणि लायन्स क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रियदर्शनी दत्तक योजने’अंतर्गत मुलींना गणवेश वाटप आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमातून गरजू विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मदतीचा हात देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रियदर्शनी दत्तक योजनेच्या अध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत लायन्स क्लबचे डॉ. सौरभ ताटे, डॉ. पाटणकर, निरंजन उजगरे आणि पांडुरंग पाटणकर हे मान्यवरही उपस्थित होते.
यावेळी दत्तक योजनेतील मुलींना मान्यवरांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच, लायन्स क्लबच्या वतीने सर्व मुलांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल दोन्ही संस्थांचे कौतुक होत आहे.