पत्रकारितेतील अस्वस्थ वास्तव ! ‘मराठी पत्रकार दिना’निमित्त विशेष लेख….

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०६ जानेवारी २०२२ । फलटण । मराठी पत्रकारितेला स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठा इतिहास आहे. समाजाला दिशा देण्याचे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे, सकारात्मक गोष्टींना लोकांसमोर आणण्याचे आणि अपप्रवृत्तींना ठेचण्याचे काम आजवर असंख्य पत्रकारांनी केलेले आहे. आज पत्रकारिता क्षेत्रात विविध माध्यमांचा प्रभाव आहे. मात्र या सर्व माध्यमांचा मूळ पाया असणारी वृत्तपत्रसृष्टी सर्वार्थाने आजही प्रभावी आहे. या आपल्या मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणार्‍या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आजच्या दिवशी म्हणजेच 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुुरुवात केली आणि त्यानंतर अनेक दिग्गजांनी ही परंपरा उज्वल केली. अगोदरच पारतंत्र्यात असलेला देश आणि त्यात अनिष्ट धार्मिक रुढी, परंपरा, चालिरीतींचा जनमानसावर मोठा प्रभाव या प्रतिकूल परिस्थितीविरोधात समाजजागृतीचे काम वर्तमानपत्राच्या माध्यमातून करण्याचे काम बाळशास्त्रींनी केले. बाळशास्त्रींचा हा प्रयोग इतका प्रभावी ठरला की पुढे जावून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीश राजवटीविरोधात लढताना एका विशिष्ठ समाजोपयोगी ध्येयवादाने पत्रकारितेची फार मोठी चळवळ सुरु झाली. किंबहुना ही चळवळ केवळ स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतच मर्यादित राहिली नाही तर त्यानंतरही नवभारताला दिशा देण्याचे काम या माध्यमातून झाले.

पत्रकारितेचा अभिमानास्पद असा हा जाज्वल्य इतिहास सर्वज्ञात आहे. पण या इतिहासाला साजेसे काम आज या क्षेत्रात होत आहे कां? आणि जर ते होत नसेल तर या क्षेत्राचे भवितव्य काय? हा या क्षेत्रासमोरचा आजच्या घडीला मोठा आव्हानात्मक प्रश्‍न आहे. एका पारड्यात मराठी पत्रकारितेचा दैदिप्यमान इतिहास आणि दुसर्‍या पारड्यात सध्याची पत्रकारिता अशी तुलना केल्यास गेल्या काही दशकांपासून पत्रकारितेचा ‘ध्येयवाद’ व्यावसायिकता, नफाखोरी व वैयक्तीक लाभ याकडे जास्त झुकू लागल्याने आजचे पत्रकारितेचे वर्तमान मात्र भूतकाळाइतके स्वच्छ आणि अभिमानास्पद नक्कीच नाही.

माध्यमांमधील वाढती स्पर्धा
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी केली जाणारी ध्येयवादी पत्रकारिता आज दुर्देवाने लोप पावत असल्याचे म्हणावे लागेल. शिवाय पूर्वी वृत्तपत्र हेच प्रसारमाध्यमांमधील प्रमुख साधन होते. मात्र आता याच्या जोडीला वृत्तवाहिन्या, सोशलमिडीया वेगाने प्रसारित होत असल्याने माध्यमांच्या या स्पर्धेमुळे पत्रकारितेत भाषा प्रदूषण, वृत्त प्रदूषण, आर्थिक तडजोडीचे प्रदूषण, नैतिक प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. व्यक्तीकेंद्रीत पत्रकारितेमुळे या व्यवसायाची प्रतिष्ठा कमी झाली आहे. आज वृत्तपत्रांबरोबरच नभोवाणी, वृत्तवाहिन्या, न्यूज पोर्टल्स, यु ट्यूब चॅनेल्स अशी वेगवेगळी प्रसारमाध्यमे कार्यरत आहेत. यातील आधुनिक प्रसारमाध्यमांमध्ये गुणवत्ता आणि सखोलता यापेक्षा झटपट बातम्या देण्यासाठी मोठी स्पर्धा पाहिला मिळत आहे. सोशल मिडीयामध्ये बातमीला जास्त व्हिजीटर्स मिळवण्याच्या स्पर्धेत बातमी अपलोड करण्याची घाई केली जाते. यातून अनेकदा चुकीची माहिती, चुकीचे संदर्भ दिले जातात. याचा मोठा परिणाम असा की; बातमी बद्दल लोकांमध्ये असलेली विश्‍वासार्हता कमी होत आहे. वर्तमानपत्रांच्या बाबतीत हे होत नसले तरी एकूणच पत्रकारितेसाठी हे घातकच आहे.

व्यावसायिकतेमुळे पत्रकारितेचा लोप
बुद्धीकौशल्याला लेखणीची जोड असेल तर विविध अंगाने पत्रकारिता करता येते. यामध्ये विकासाच्या संकल्पना मांडणारी ‘विकास पत्रकारिता’, अपप्रवृत्तींना चव्हाट्यावर आणणारी अथवा दुर्लक्षित घटकांचा शोध घेवून त्यांना प्रकाशझोतात आणणारी ‘शोध पत्रकारिता’, एखादी घडलेली घटना, त्यामागच्या घडामोडी व त्याचे एकूण भविष्यात होणारे संभाव्य परिणाम वर्तवणारी ‘अन्वयार्थक पत्रकारिता’, राजकीय, सामाजिक प्रश्‍नांवर समतोल लिखाण करणारी ‘वार्तापत्रे’ यांचा समावेश होतो. मात्र पत्रकारितेच्या या बाजू हाताळणारे पत्रकार सध्या कमी दिसत आहेत. वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातींना प्राधान्य असल्याने जागेची अडचण, बातम्यांसाठी आखून दिलेली शब्दमर्यादा यामुळेही लेखन मर्यादा पडत आहे. तर दुसरीकडे प्रदीर्घ वाचनाची आवड नसणारे लोक सोशल मिडीयावरील बातम्यांचे व्हिजीटर्स असल्याने त्या ठिकाणी कमीत कमी शब्दात असणार्‍या बातम्याच दिल्या जात आहेत. शिवाय लेखन कौशल्यापेक्षा जाहिरात मिळवून देण्याचे कौशल्य तोलून बातमीदार नियुक्त केले जात असल्याने त्यांनाही लिखाणाचा उल्हास कमीच असतो. ज्यांच्यात लिखाणाची क्षमता आहे ते जाहिरातींच्या टार्गेटमुळे त्याचदृष्टीने आपली लेखणी चालवतात. बातमीसाठी आपले कौशल्य खर्च न करता समुहातील कुणी तरी एकानेच बातमी करायची आणि नवीन ‘कॉपी-पेस्ट’ परंपरेत ती आपापल्या वृत्तपत्राकडे पाठवून द्यायची हा नवा पायंडा यातूनच सध्याच्या पत्रकारितेत पडला आहे. त्यामुळे एकूणच व्यावसायिक धोरणाच्या अतिरेकामुळे पत्रकारितेतील स्वतंत्र लिखाणाची परंपरा कमी होत असून एकसारख्या बातम्या सगळीकडे दिसून बातम्यांप्रती वाचकांची नकारात्मकता वाढत आहे.

प्रतिष्ठेसाठी शिरकाव
पत्रकारितेला एक वेगळी सामाजिक प्रतिष्ठा आहे. शासकीय, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात पत्रकारांना मानसन्मान मिळत असतात. सर्वसामान्यांचाही पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टीकोन आदरयुक्त असतो. नावापुढे पत्रकार ही पदवी लागली आणि जनमानसात तशी ओळख झाली की ही प्रतिष्ठा आपोआप मिळत जाते. त्यामुळे ही प्रतिष्ठा मिळवण्याच्या उद्देशाने अनेक अपप्रवृत्ती या क्षेत्रात आज शिरकाव करत आहेत. पत्रकारितेच्या सुरक्षेची झुल पांघरायची आणि आपले ‘नको ते उद्योग’ साधायचे या उद्देशाने अनेक मंडळी या क्षेत्रात येवून गालबोट लावत आहेत. ‘प्रेस’ लिहिलेले ओळखपत्र वाटून ‘पत्रकार’ घडवले जात आहेत; हे अतिशय दुर्दैवी आहे. मुळात ‘पत्रकार’ या संज्ञेला कोणतेही मोजमाप शिल्लक ठेवले जात नसल्याने ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी स्थिती या क्षेत्राची झाली आहे. लिहिणारे कमी आणि मिरवणारे जास्त ही अवस्था अगदी मोठमोठ्या शहरांपासून गावोगावी आपल्याला पहायला मिळत आहे. पत्रकारांसाठी कोणतीही योजना राबवताना शासनाला वा सामाजिक संस्थांना ‘नक्की पत्रकार कुणाला म्हणायचे?’ हा पडणारा प्रश्‍न ‘खर्‍या’ पत्रकारांसाठी धोकादायक ठरत आहे.

गटा-तटांत विभागणी
पत्रकारिता करताना पत्रकारांची भूमिका समतोल असणे आवश्यक असते. मात्र आज ठिकठिकाणी पत्रकारांची स्थानिक गटा – तटांत विभागणी झाल्याचे आपल्याला प्रकर्षाने दिसून येते. राजकीय फायद्यासाठी राजकारणी लोक पत्रकारांना जवळ करतात. शिवाय पत्रकारांचीही सामाजिक क्षेत्रातील सततच्या वावरामुळे राजकीय महत्त्वाकांक्षा आपोआप जागृत होते. विविध राजकीय पक्षांच्या मदतीने ग्रामपंचायतीपासून अगदी संसदेपर्यंत पोचलेले पत्रकार डोळ्यासमोर असल्याने राजकीय फायद्यापोटी वा आपली सामाजिक उंची वाढवण्यासाठी सत्ताकेंद्रीत पत्रकारिता होताना दिसते. त्यामुळे आमूक पत्रकार ‘अमक्या’ पक्षाचा, दुसरा ‘त्या’ पक्षाचा असे राजकीय शिक्के अनेकांवर पडतात. यातून पत्रकारितेत गटबाजी, बातम्यांच्या प्रसिद्धींमध्येही राजकारण होते. हे संकेतही निश्‍चितच भविष्यात तोट्याचेच ठरणारे आहेत.

एकूणच या व्यतिरिक्तही काही प्रकार पत्रकारितेचे महात्म्य कमी करण्यासाठी कारणीभूत ठरणारे आहेत. पण अजूनतरी हे क्षेत्र अगदीच टाकावू झाले आहे असेही म्हणता येणार नाही. पत्रकारितेमध्ये ‘जनमत’ घडवण्याची ताकद आजही शाबूत आहे. निर्भीड पत्रकारिता काही अंशी टिकून असल्याने योग्य त्या ठिकाणी पत्रकारितेचा ‘वचक’ अद्याप कायम आहे. फक्त हा ‘वचक’ आदरयुक्त असावा तो दहशतयुक्त नसावा, पत्रकारितेच्या प्रवाहात येणार्‍यांसाठी संबंधित शिक्षणाच्या वा अन्य आवश्यक त्या अटी निर्धारीत व्हाव्यात व स्पर्धेत टिकून राहताना बातमीदारीची हेळसांड होणार नाही एवढे कटाक्ष पाळण्यासाठी प्रयत्न झाल्यास पत्रकारितेचे भवितव्य सुरक्षित राहिल.

शेवटचा मुद्दा :
पत्रकारितेचे यश हे मुळात समाजमनावर आहे. समाजमन जागृत ठेवणे आणि समाजाला दिशा देणे हे जर योग्य पद्धतीने झाले तरच समाजाकडूनही पत्रकारितेला चांगला प्रतिसाद मिळेल. समाजाकडून जर पत्रकारितेची हेटाळणी सुरु झाली तर मात्र पत्रकारितेला तशी फारशी किंमत उरणार नाही आणि या क्षेत्राविषयी लोकांचा ‘अवैध’ दृष्टीकोन तयार होईल. कोणतीही व्यक्ती कौतुकाने नाही तर कर्तृत्त्वाने श्रेष्ठ ठरत असते. त्यामुळे कौतुकाच्या मागे न लागता पत्रकारितेच्या पावित्र्याशी प्रामाणिक राहून आपले कर्तृत्त्व सिद्ध करावे. बदलत्या काळात ‘बाळशास्त्री’, ‘लोकमान्य’ यांच्याप्रमाणे 100% ‘निस्वार्थी’ पत्रकारिता अजिबात अपेक्षित नाही; परंतू व्यवसाय अथवा अर्थार्जनाचे साधन म्हणून या क्षेत्रात काम करीत असताना पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांना धक्का लागणार नाही याची खबरदारी जर प्रत्येकाने घेतली तरच हा लोकशाहीचा चौथा स्तंभ अबाधित राहील; असे आजच्या राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देताना प्रकर्षाने वाटते.

। रोहित वाकडे, संपादक, साप्ताहिक लोकजागर, फलटण.


Back to top button
Don`t copy text!