स्थैर्य, फलटण : इसवीसनापूर्वीपासूनच्या कालखंडातील अवशेष त्याचप्रमाणे चक्रपाणी महाराज, रामायण, महाभारत, शिवकाल या काळातील घटनांचा साक्षीदार असणार्या फलटण येथे अनेक मंदिरे व वास्तुशिल्पांचे उत्तम नमुने आढळतात. यावरुन फलटणचा इतिहास किती जुना आणि नवअभ्यासकांना मार्गदर्शक आहे, हे यावरुन स्पष्ट होते. पुणे येथील नरेंद्र वेलणकर यांनी आपल्या फेसबुक वॉलवर याबाबत दिलेल्या माहिती…
फलटण हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक तालुका व शहर आहे. फलटण शब्दाची उत्पत्ती फल पत्तन (अर्थात फळबागांचा प्रदेश) अशी असावी, असे म्हटले जाते. फलटण क्षेत्रातील धुमाळवाडी आणि दक्षिण पट्ट्यातील डाळिंबे जगभरात निर्यात होतात. फलटणचा ग्रामीण भाग कृषी क्षेत्रात प्रगत असून नीरा उजवा कालवा सिंचन योजना ही तेथील कृषी क्षेत्रासाठी संजीवनी ठरला आहे. बाणगंगा नावाची एक नदी फलटण गावातून वाहते. नदीवर एक पूल आहे. त्याच्या एका बाजूला फलटण आणि दुसर्या बाजूला मलठण ही गावे आहेत. नदीचे पात्र बहुतांशी कोरडे असते. पुण्याहून फलटणला जाताना आधी मलठण लागते. फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जाई. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची यात्रा होते. या यात्रेला पंजाब, बिहार, उत्तरी भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. यालाच रामयात्रा व रामदिवाळी असे देखील म्हणतात. या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लोक येतात. फलटण येथील पुरातन हेमाडपंथी जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे.
फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजे होते. फलटण ही महानुभाव संप्रदायाचे चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी आहे. फलटण येथील राम मंदिर आणि मुधोजी मनमोहन राजवाडा ह्या अति प्राचीन वास्तू जतन केल्या आहेत. कैक चित्रपट/दूरचित्रवाणी मालिका ह्यांचे चित्रीकरण आजही ह्या वास्तूंमध्ये होत असते. मराठी फिल्मसृष्टीत नावलौकिक मिळवणारा फलटणकरांचा बिरोबा फिल्म्स निर्मित होऊ दे जरासा उशीर नावाचा चित्रपट ऑस्करच्या जागतिक फिल्म्स फेस्टिव्हलला पाठवला गेला होता. फलटण तालुक्यात राजुरी गावामध्ये सांगते ऐका या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. राममंदिर येथेही चित्रपटांचे व टी व्ही मालिकांचे शूटिंग होत असते.
फलटण हे ऐतिहासिक असून इतिहास काळापासूनच आपण या नावागावांशी जोडले गेलेलो आहोत. स्वराज्याच्ये शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि फलटणचा ऋणानुबंध आहे. फलटण येथील राजवाडा हा शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. त्याचप्रमाणे अनेक पुरातन मंदिरे या शहरात व परिसरात आहेत. या मंदिरांचे जतन व पुनरुज्जीवन करुन जोपासना करतानाच औद्योगीक पातळीवर अनेक सहकारी संस्था व खाजगी उद्योग येथे कार्यरत आहेत. येथील औद्योगिक वसाहतीतील कमिन्स कंपनीमुळे फलटण चा चेहरामोहरा बदललेला आहे. आळंदी-पंढरपूर या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावरील फलटण हे मध्यवर्ती शहर आहे. याच दरम्यान जेजुरी, मोरगावं, बारामती, शिखर शिंगणापूर आदी विकसीत व धार्मिक गावे व प्रसिध्द मंदिरांची गावेही येथून नजिकच्या अंतरावर आहेत. फलटण येथील प्राचिन, पुरातन मंदिरांमुळे या शहराला एक आगळेवेगळे महत्व आहे. काळाच्या ओघात काही मंदिरांची पडझड झाली असली तरी त्याचे महत्व ऐतिहासिक आहे. येथे अश्मकालिन युगापासून मनुष्यवस्ती असल्याचे पुरावे मिळतात. इसवी सन 687 साली विनयादित्य नावाच्या राजाने फलटण जवळील भाडळी या गावात त्याच्या सैन्याचा तळ असताना एका ब्राम्हणाला वीर नावाचे गावं दान दिल्याचे ताम्रपटावरुन आढळते. यावरुन त्याकाळी फलटण हे आजूबाजूंच्या गावांचे व्यापारी केंद्र तसेच जिल्ह्याचे ठिकाण व मोठी बाजारपेठ येथे असल्याचा निष्कर्ष निघतो. येथील खंडोबा मंदिरातील पुजार्याकडे दगडी लाटण्यावर त्याला पूजा करण्याचा अधिकार दिल्यासंबंधी मजकूर असलेला शिलालेख आढळला. यावरुनच लिहून ठेवणे हे त्याकाळी महत्वपूर्ण असल्याचे सिध्द होेते. याची विविध ताम्रपटांच्या अभ्यासा दरम्यान वीर नावाचे गावं ब्राम्हणाला दान दिल्याचे अभ्यासताना यात कलठण असा उल्लेख आढळला. तेच फलटण असून याचा रामायण महाभारतात संदर्भ आढळतो. येथील बाणगंगा नदीचा उगम हा याचा संदर्भ आहे. फलस्थ ऋषींचे गावं म्हणून या गावाचे नाव फलस्थान असे पडले. येथे महानुभव पंथीयांचे मठ आहेत. रामाने जेव्हा लक्ष्मणाला सांगितले की, तू सीतेला ठार मार तेव्हा रामाला स्त्री हत्येचे पातक लागले. त्यापासून मुक्तीसाठी राम फलस्थ ऋुषीकडे आले. परंतु हे पापक्षालन मी नाहीतर दत्तगुरु करु शकतील असे ऋषींनी सांगितले. दत्तगुरु तेथे आल्यानंतर रामाने त्यांना नमस्कार करुन आपली व्यथा दत्तगुरुंंना सांगितली. दत्तगुरुंनी पायाचा अंगठा जमिनीत दाबल्यानंतर जे पाणी आले ते प्राशन केल्यानंतर राम हे पापमुक्त झाले अशी मौखिक आख्यायिका आहे. यावरुनच फलटण हे रामायण काळात महत्वाचे असल्याचे दिसते.
फलटण जवळ काळज गावातं खंडोबाचे बाहेरुन न दिसणारे परंतु मोठे मंदिर आहे. यातील छोट्या गाभार्यात शंकराची पिंड आहे. मौखिक परंपरेनुसार खंडोबाचे लग्न झाल्यानंतर मलवडी येथे हळद लावण्याचा कार्यक्रम होता. पाली ला लग्न होते. काळजला त्यांची वरात निघते व जेजुरीला कंकण सोडविण्याचा कार्यक्रम होता. हे सर्व कार्यक्रम प्रत्येक महिन्याला अनुसरुन आहेत. मार्गशीर्ष पोर्णिमेला हळद लागते. पौष पोर्णिमेला लग्न लागते. माघ महिन्यात वरात निघते. आणि चैत्र पोर्णिमेला कंकण सुटते. हा सहा महिन्यांचा कालावधी आहे.
फलटणमध्ये हिंदू,जैन,महानुभव पंथीय मंदिरे आढळतात. यामध्ये जबरेश्वर, सिध्देश्वर, महानुभव पंथीयांचे कृृष्णमंदिर, मलठणचे महादेव मंदिर, महानुभवांचे दत्तमंदिर आहे. यातील जबरेश्वर मंदिर पाहिले असता शिल्पकला व कलाकुसरीचा उत्तम नमुना असून कोरीवकामातील शिल्प पाहिले असता एकेकाळी ते जैनमंदिर असल्याचे आढळते. येथील बाणगंगेच्या बाजूला माणकेश्वर मंदिर आहे. तेथे नंदीमंडप व विहिर आहे. येथे असलेल्या पुर्वीच्या जुन्या खांबांमुळे येथे जुने मंदिर पाडून नविन मंदिर बांधल्याचे दिसून येते. या मंदिरात यादवकालीन खुणा आढळतात. आतमध्ये चौकोनी शिवलिंग आहे. बाहेरुन पाणी आतमध्ये जमा करण्यासाठी कोनाडा आहे. कळसावर विष्णूची भग्न मुर्ती आढळते. येथेच उमा महेश मुर्ती आहे. यामंदिरासमोर सिध्देश्वर मंदिर आहे. दोन्ही मंदिरात साम्य आढळते. या मंदिरांच्या विटांचा आकार मोठा असून जाड आहे. या विटा सातवाहन काळातील साधर्म्य दर्शवितात. बाहेरील बाजूस भग्नावस्थेतील नंदी दिसून येतो. मंदिर परिसरात एक गणपती व एक नृत्य गणेशाची मुर्ती आहे. दोन्ही मुर्तींच्या चेहरापट्टीत फरक असून साधा गणपती हा पेशवाई काळातील व नृत्य गणेश हा त्यापुर्वीचा असल्याचे दिसून येते. बाहेर दागदागिने कोरलेली विष्णू केशवांची मुर्ती आहे. यामुर्तीच्या हातातील गदा ही विलक्षण आहे.
येथील महानुभव मंदिरात मध्यभागी पाण्याचा कुंड आहे. याच्या चारही बाजूला लोकं राहू शकतील असा प्रकार आहे. तेथेच कृष्णमंदिर असून गाभार्यात जाण्यासाठी पायर्या आहेत. येथे ओट्याची पूजा केली जाते. वरील ललाटबिात गणपती दिसतो. स्तंभावरील कोरीवकाम लक्षवेधी असून जटायू-रावण लढाई हत्तीवरुन लढाई असे प्रसंग कोरलेले आहेत. याचा संदर्भ वाल्मिकी रामयणातील वाली सुग्रीव या निर्णायक युध्दातील आढळतात. याच चित्रात रामही दिसतात. दुसर्या चित्रात मारीच वध श्लोक आढळतो. येथेच एका शिल्पात अरण्यकांड दिसते. मलठणमध्ये महादेव मंदिर आहे. तेथे दोन गाभारे असून कालिया मर्दनाची शिल्प आढळतात. एकाच एका शिल्पात मेष व हत्ती दिसतो. बाहेर विष्णूचे शिल्प आढळते. येथील महानुभव दत्तमंदिरात प्रवेशद्वार व अवतीभोवती मोठा प्राकार आहे. चारीबाजूंनी स्ट्रक्चर व मध्यभागी मंदिर आहे. नंदीमंडप आहे. बाहेर भग्न अवस्थेत नंदी आहे. आतमध्ये पंचशाखीय द्वारशाखा आहेत. खांबावर कुबेर कोरलेले आढळतात. आतील द्वारशाखेवर नृत्यगणेश व सरस्वती कोरलेले आढळतात. तसेच आतील स्तंभावर भैरव व महिषासुर मर्दिनी कोरलेले आढळतात.ही दोन्ही शक्तीची रुपे आहेत. वरच्या भागात साधक,कृष्ण दिसतात. चारहीबाजूंनी आजूबाजूला ओवर्या होत्या. तेथे बाहेरुन आलेले व्यापारी, लोक राहू शकतील.
या सर्व मंदिरांच्या बांधणीवरुन पैशांची येथे भरभराट असल्याचे सिध्द होते. यावरुन येथे मोठे व्यापारी केंद्र होते लोकं जा-ये करत होते फलटणच्या आजूबाजूला गावे व वस्ती होती असे आढळते. येथे महादेव, भैरव काळभैरवनाथाची मंदिरे प्रामुख्याने आढळून आली. या परिसरातच मेंढपाळ धनगर लोकांचे वास्तव्य असल्याचे आढळते.काळज, लाटे मुरुम येथेही मंदिरे आहेत. येथील मंदिरे मोठ्या गाभार्याची आढळतात. तडवळे, निंभोरे येथे लहान गाभार्याची मंदिरे आढळतात. बहुतांश मंदिरांचा ढाचा जुना असला तरी शिखरे नव्याने बांधल्याचे निदर्शनास येते. या मंदिरांमध्ये उत्सव मोठ्याप्रमाणात होतात. जुन्या गावांत नंदीमंडप आढळतो, बहुतांश गावांत काळभैरवनाथाची मंदिरे आढळतात. सगळ्या गावात शंकर व हनुमान मंदिरे आढळतात. लढाईत धारातीर्थी पडलेल्या विरांची विरगळ वेगवेगळ्या स्वरुपात दिसून येतात. विरगळ नदीकाठी प्रामुख्याने आढळतात बाहेरआढळलेल्या विरगळींतून लढाईशिवाय पाळीव प्राण्यांना वाचविताना धारातिर्थी पडलेल्या विरांच्या विरगळ आहेत. यात गाईगुरे दर्शविलेली आढळतात यावरुन येथे दुग्धता मोठ्याप्रमाणात उपल्बधता दिसून येते व गाईगुरांसाठीही लढाई झाल्याचे निष्पन्न होते. फलटण परिसरात खंडोबा, बिरोबा, धुळोबा मंदिरे आढळतात. बिरोबाची मंदिरे गावाबाहेर आढळतात. ढवळ गिरवीरोड येथे बिरोबा, धुळदेव कांबळेश्वर येथे धुळोबा सांगवी काळज येथे खंडोबा ही मंदिरे मजल दरमजल टप्पा पार करतानाच्या मार्गावर दिसून येतात. यावरुन धनगर समाजातील लोक बाजारहाट करण्यासाठी आल्यानंतर याठिकाणी थांबत असल्याचा निष्कर्ष निघतो.
भाडळी दुधेबावी येथे अभिलेख लक्ष्मी, गजलक्ष्मी मंदिरांचे अवशेष आढळतात. गजलक्ष्मीभोवती दोन हत्ती सोंडेने पाणी घालताना दिसतात. यातील लक्ष्मी हे पृथ्वीचे रुप व पाणी घालणारे हत्ती हे ढगांचे रुप असल्याचे सांगितले जाते. यातूनच हे संपन्नता व समृध्दीचे लक्षण असल्याचे पुढे येते. त्यामुळेच समृध्दीसाठी गजलक्ष्मीचे रुप मानले गेले आहे. धुळदेव येथे उघडे शिवलिंग,सतीचा हात तसेच गाढवाला रावणाचे तोंड असलेले शिल्पे आढळतात. त्याचप्रमाणे सितामाई डोंगरात बाणगंगेचा उगम झाला तेथे सितामाईची मुर्ती असून तेथे आजही पूजा केली जाते. तर ढवळ या गावी सुर्यमुर्ती दिसते. ही मुर्ती ढवळाईदेवी या नावाने पूजली जाते. परंतु बारकाईने निरिक्षण केल्यास ही सुर्यमुर्ती असल्याचे दिसते. लाटे या गावात शिवलिंग असून येथे मुखलिंगावर शिव आणि विष्णू दिसतात. डाव्या बाजूला नाग मुकूट आणि तिसरा डोळा आहे.