दैनिक स्थैर्य । दि.०४ फेब्रुवारी २०२२ । फलटण । सातारा जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा फलटण उप विभागातील हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील सर्व २४ गावात जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे स्वच्छ, शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सुमारे ४० कोटी रुपयांच्या योजना मंजूर झाल्याची माहिती महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचे या कामी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे नमूद करीत त्यामुळेच जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये एकाच वेळी पाणी पुरवठा योजना मंजूर करुन प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट यांनी सांगितले.
सासवड प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या यापैकी सासवड, हिंगणगाव, नांदल, घाडगेवाडी, कापशी व आळजापूर या गावांसाठीही जल जीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजना उभारण्यास काही अटी, शर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मुंबईने मान्यता दिली आहे.
या २४ गावांपैकी २४ लाख ७० हजार रुपये खर्चाची वाघोशी गावातील पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आहे, तर २६ कोटी ८७ लाख ४१ हजार रुपये अंदाजित खर्चाच्या ९ गावातील योजना मंजूर असून त्यांची निविदा प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यामध्ये आदरकी बु|| ८२ लाख ८८ हजार, बिबी ७६ लाख ३१ हजार, टाकुबाईचीवाडी २४ लाख ७४ हजार, परहर बु|| १७ लाख १४ हजार, काशीदवाडी २४ लाख ८० हजार, आळजापूर २४ लाख ९४ हजार, नांदल १ कोटी २४ लाख ४८ हजार, सासवड (गावठाण) ९८ लाख १२ हजार, कापशी २२ लाख १४ हजार रुपये अंदाजित खर्चाचा समावेश आहे.
५ कोटी १२ लाख ४५ हजार रुपये अंदाजित खर्चाच्या ६ गावातील पाणी पुरवठा योजनांना तत्वतः मंजुरी प्राप्त झाली असून पुढील प्रक्रिया सुरु आहे, त्यामध्ये घाडगेवाडी ५६ लाख ५३ हजार, हिंगणगाव १ कोटी १ लाख १९ हजार, वडजल ४२ लाख ५९ हजार, सुरवडी १ कोटी ३० लाख ९३ हजार, मिरगाव १ कोटी १२ लाख ८४ हजार, घाडगेमळा ६८ लाख ४५ हजार रुपये या ६ गावांचा समावेश आहे.
आदरकी खुर्द, शेरेचीवाडी (हिं), ढवळेवाडी (निं), मलवडी, वडजल, कोहाळे या ६ गावांसाठीही नळ पाणी पुरवठा योजना मंजूर असून त्यांची अंदाजपत्रके तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत एकाचवेळी संपूर्ण जिल्हा परिषद मतदार संघात प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील असलेला हिंगणगाव हा जिल्ह्यातील पहिलाच गट आहे.