दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । सातारा । येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने जिमखाना विभागाने योग प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणात विद्यार्थी ,प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक सहभागी झाले होते. या प्रशिक्षणात महाविद्यालयाची मानसशास्त्र विभागाची विद्यार्थिनी योग शिक्षिका ,बी.ए.भाग -3 या वर्गातील मानसशास्त्र विषयाची विद्यार्थिनी कु.मुग्धा भोसले हिने सर्वाना योग आणि आपले जीवन व आरोग्य या संबंधीची माहिती दिली. तसेच योगाचे महत्व सांगून योगासनाचे विविध प्रकार प्रात्यक्षिक स्वरुपात सर्वांकडून करवून घेतले.या मध्ये प्रारंभी योग प्रार्थना घेतली. योगासन करण्यासाठी पूरक हालचाली करवून घेतल्या.त्यानंतर दंड स्थितीतील आसने ताडासन ,पाद हस्तासन,त्रिकोणासन ही त्यांनी शिकविली. बैठक स्थितीतील आसने भद्रासन ,बद्द्कोनासन ,वज्रासन,अर्ध उष्ट्रासन,शशांकासन,ही घेण्यात आली. पोटावरची आसने मकरासन ,भुजंगासन ,शलभासन ही शिकविण्यात आली .आणि पाठीवरची आसने सेतू बंधासन,अर्ध हलासन, पवन मुक्तासन, शवासन इत्यादी आसने देखील व्यवस्थित घेतली.त्यानंतर नाडी शोधन प्राणायाम ,अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम घेतले व ध्यान प्रक्रिया शिकविली. त्यानंतर प्रार्थना घेतली ,तीन ओमकार आणि शांतीपाठ घेतला. योग साधना आयुष्यास उपकारक असल्याचे सांगून नित्यनेमाने केल्यास आयुष्य संवर्धन होत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुग्धा हिने योगविज्ञान गुरुकूल नाशिक येथे योग प्रशिक्षण घेतले असून तिने आयुष मंत्रालय प्राप्त योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्स केला आहे. यावेळी राष्ट्रीय खेळाडू तुषार काळोखे व अर्चना जगताप हिने योग प्रात्यक्षिके करून दाखवण्यासाठी सहयोग दिला. जिमखाना विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विक्रमसिंह ननावरे यांनी प्रशिक्षक विद्यार्थी यांना संधी देऊन त्यांच्याद्वारे योग प्रशिक्षण देण्याचे आयोजन केले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी चांगले प्रशिक्षण दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने योगदिनी योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.रामराजे माने देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.