
स्थैर्य, फलटण, दि. ४ ऑक्टोबर : चेअरमन सचिन यादव यांच्या दूरदृष्टी आणि कुशल नेतृत्वाखाली ‘गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ने आपल्या यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. फलटण, राजाळे, साखरवाडी आणि पिंपरी चिंचवड येथे विश्वासार्ह सेवेचा ठसा उमटवल्यानंतर, संस्थेने आता बारामती येथे आपल्या भव्य नूतन शाखेचे उद्घाटन केले आहे. लवकरच ‘गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टिपर्पज’चे कामकाजही बारामतीत सुरू करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा चेअरमन सचिन यादव यांनी यावेळी करून आपल्या नियोजनाची चुणूक दाखवली.
या शानदार सोहळ्याचे उद्घाटन बारामतीचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) प्रमोद दुरगुडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे आधारस्तंभ, चेअरमन सचिन यादव होते. यावेळी संचालिका सुजाता यादव, वरिष्ठ अधिकारी अशांत साबळे, गणेश निकम, हेमंत खलाटे यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन यादव: विश्वासाचे दुसरे नाव
चेअरमन सचिन यादव यांच्या कुशल व अभ्यासू नेतृत्वामुळेच “गॅलेक्सी म्हणजे विश्वास” ही ओळख संस्थेने अवघ्या ५ वर्षांत प्रस्थापित केली आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे संस्थेचा एकूण व्यवसाय आज ९८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. संस्थेची सभासद संख्या १०,००० पेक्षा जास्त असून, यामध्ये ५४ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ४४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण यांचा समावेश आहे. संस्थेने १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना स्थिर रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
उत्कृष्ट सेवेचा ठसा
संस्थेने आपल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सलग ४ वर्षे ‘बँको ब्ल्यू रिबिन पुरस्कार’ पटकावला आहे आणि सातत्याने ‘ऑडिट वर्ग अ’ दर्जा कायम ठेवला आहे. संस्थेचा एन.पी.ए. (NPA) १% पेक्षा कमी ठेवण्यात व्यवस्थापन यशस्वी ठरले आहे. संस्थेच्या प्रत्येक शाखेत अत्याधुनिक गोल्ड टेस्टिंग मशीन उपलब्ध असून, केवळ ५ मिनिटांत सोने तारण कर्ज दिले जाते, ज्यामुळे सभासदांना त्वरित आर्थिक मदत मिळते.