अनधिकृत मोबाइल टॉवरची थकबाकी साठ लाखाच्या घरात; कारवाईच्या नावाने वसुली विभागाच्या झोपा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा पालिकेच्या हद्दीत परवाना संपलेल्या अनधिकृत मोबाइल टॉवरची संख्या 46 च्या घरात असून या टॉवरची थकबाकी 60 लाख 90 हजारावर पोहोचली आहे . पालिकेच्या रेकॉर्डवर शहरात केवळ पाचच मोबाइल टॉवर असून इतर टॉवरवर कारवाई करण्यास शहर विकास विभागाने डोळेझाक केली आहे.

सातारा पालिकेच्या महसुलाला सरकारी गळती लावण्याचा कार्यक्रम शहर विकास विभागाने केल्याची सातत्याने होत आहे . एका सवेक्षण अहवालानुसार सातारा शहरात तब्बल 46 विनापरवाना मोबाइल टॉवर असून यांची शहर विकास विभागांकडे नोंदच नसल्पाची धक्कादायक माहिती समोर आली आहे . या मोबाइल टॉवरचा एकूण थकित मालमत्ता कर 12 लाख 69 हजार 795 आहे . थकबाकी 42 लाख 51 हजार 496 असून ही थकबाकी 31 मार्च अखे 60 लाख 90 हजार 783 च्या घरात पोहोचणार आहे.

भवानी पेठ , शुक्रवार पेठ गुरुवार पेठ आणि यादोगोपाळ पेठ येथे असणारे शहरातील केवळ पाचच टॉवर अधिकृत असून त्यांची थकबाकी 2 लाख 58 हजार 994 इतकी आहे . मात्र सदर बझार परिसरात तब्बल नऊ मोबाइल टॉवर अनधिकृत असताना त्यांच्यावर कारवाई करण्या संदर्भात शहर विकास विभागाने हेतुपुरस्सर डोळेझाक केली आहे . त्यानंतर शनिवार पेठ , मल्हार पेठ व्यंकरपुरा गुरुवार पेठ आणि केसरकर पेठेत उभे राहिलेल्या अनधिकृत टॉवर उभारताना शहर विकास विभागाचे निर्देश गुंडाळून ठेवण्यात आल्याची राजकीय ओरड असताना हे प्रकरण राजकीय दबावाने दडपण्यात आल्याची चर्चा आहे . शहर विकास चे भागनिरिक्षक आणि मिळकत धारक तसेच मोबाइल कंपनी या त्रिकुटाच्या मधुर संबंधांनी पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल खड्ड्यात घातला आहे. सातारा शहरातल्या मोबाइल टॉवर प्रश्नी शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे . सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी सुद्धा उच्च न्यायालयात या प्रश्नी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिल्याने पालिका वर्तुळात एकच हडकंप माजला आहे . या गंभीर प्रश्नावर प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तातडीने लक्ष घालावे अशी सातारकरांची मागणी आहे.


Back to top button
Don`t copy text!