दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । सातारा । प्रतिष्ठा फौंडेशन आयोजित 5 व्या ‘प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन 2021′ च्या प्रतिष्ठा पुरस्कार प्रदान सोहळय़ात सातारच्या योग व निसर्गोपचार तज्ञ उमा सुभाष चौगुले यांना ‘प्रतिष्ठा योगरत्न पुरस्कार’ ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार वितरण सोहळा तासगाव, जि. सांगली येथे पार पडला. यावेळी संमेरनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शेखर गायकवाड व स्वागताध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशालदादा पाटील यांच्या हस्ते उमा चौगुले यांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या 5 व्या प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनात सातारच्या उमा चौगुले यांचा प्रतिष्ठा योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आल्याने सातारच्या शिरपेचात आणखीन एक तुरा रोवला गेला आहे. उमा चौगुले यांनी गेली 22 वर्षे बालकांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनाच त्यांनी योगाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्ररत्न केला आहे. योग ही केवळ साधना नाही तर आजच्या वेगवान जगाची मानसिक व शारिरीक गरज आहे, हे त्यांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून पटवून दिले आहे, याचीच दखल घेत त्यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
उमा यांच्या 22 वर्षाच्या योग प्रचार आणि प्रसाराच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांची महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स्’च्या अधिकृत योग पंच परिक्षक म्हणून ही त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यातच त्यांना नुकतेच ‘प्रतिष्ठा योगरत्न पुरस्कार’ ने गौरविण्यात आल्यासंबंधी त्यांना सर्व स्तरातुन गौरविण्यात येत आहे.