स्थैर्य ,मुंबई, दि, २८: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक शब्दात हल्लाबोल केला आहे. ‘कोरोना काळात भ्रष्टाचार करण्यात आला असा त्यांनी आरोप केला. या आरोपातून ते कोरोना योद्ध्यांची चेष्टा करत आहेत. मला विरोधी पक्षनेत्यांची कीव करावीशी वाटते,’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
‘विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेत काही आरोप केले. विरोधी पक्ष आहे म्हणून आरोप केले, पण त्याला काही अर्थ पाहिजे. काहीही आरोप करायचे ही नवी पद्धत झाली आहे. असा विरोधी पक्ष महाराष्ट्राने कधी पाहिला नाही,’ अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे? पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :
– थापा मारायच्या, खोट बोल पण रेटून बोल अशी त्यांची सवय
– 29 हजार कोटी जीएसटी येणे बाकी, लातूर आणि आसपास मदत पुर्नवसन रक्कम केंद्र सरकारकडून येणे बाकी
– कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू
– दुसरी लाट वाढू नये यासाठी प्रयत्न, रूग्ण संख्या वाढत आहेत तिथं सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत
– ज्यांना सावरकर यांची जयंती की पुण्यतिथी हे माहिती नाही… त्यांना आमच्यावर आरोप करायचा काहीच अधिकार नाही
– सत्तेत केंद्रात राज्यात तुम्ही पाच वर्ष होते, कर्नाटकात आता भाजपाचे सरकार आहे… पण बेळगांव प्रश्न सोडविला नाही
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनापूर्वी सरकारवर विविध मुद्द्यांवरून आरोप केले होते. त्या सर्व आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनातही या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.