दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२३ । मुंबई । रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पा विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कोकणातील राजकारण तापलं आहे. या दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बारसूच्या दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यावर असताना त्यांनी काही महत्त्वाची विधाने केली. उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावरूनच, प्रदेश भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
“अखेर उद्धव ठाकरेंच्या पोटातलं ओठावर आलं…ते ज्या कामात एक्सपर्ट आहे तेच बोलून दाखवलं. ज्या महाराष्ट्रानं तुम्हाला घडवलं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करता?? उद्धव ठाकरे, तुम्हाला महाराष्ट्र घडवायचा नाही तर पेटवायचाय… उद्धव ठाकरे तुम्ही महाराष्ट्राच्या मातीशी, आपल्या आईशी गद्दारी करताय पण आम्ही तुमचे मनसुबे उधळून लावू. कर्तबगार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला लाभले आहेत. ज्यांनी तुमच्यासारख्या भल्याभल्यांना वठणीवर आणलंय,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केले.
उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले होते?
“मी प्रकल्पासाठी पत्र लिहिलं होतं. मात्र लोकांवर जबरदस्ती करून प्रकल्प करा असं मी म्हटलं नव्हतं. हुकूमशाहीच्या माध्यमातून हा प्रकल्प लादू नका. राज्य सरकारने हुकूमशाही करून हा रिफायनरी प्रकल्प येथे लादण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही महाराष्ट्र पेटवू. आज मी इथे येऊन उभा आहे. आता जे या प्रकल्पाचं समर्थन करत आहेत. त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त बाजूला ठेवून समोर या आणि रिफायनरीचं समर्थन करून दाखवावं, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. महाराष्ट्राच्या वाट्याला राख आणि गुजरातच्या वाट्याला रांगोळी, असं होता कामा नये,” अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली होती.