दैनिक स्थैर्य । दि. ०४ मे २०२३ । मुंबई । गेल्या काही दिवसापासून कोकणातील बारसू येथील नियोजीत असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. बारसू येथील स्थानिक नागरिकांनी काही दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. आता बारसू येथील आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी आमदार रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
रामदास कदम म्हणाले, स्वत: मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी बारसूची जागा दाखवली आहे. आणि आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी सरड्यासारखा रंग बदलला आहे. जो प्रस्ताव तुम्हीच घेतला त्याला आता का विरोध करत आहात. तिथे लाठीचार्ज व्हावा, गोळीबार व्हावा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी ते बारसूमध्ये येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्त होण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाला आता राज्यभरात कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. यावरही माजी आमदार कदम यांनी प्रतिक्रिया दिली. कदम म्हणाले, शरद पवार साहेब यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. त्यांनी दाखवून दिले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. मागील काही दिवसापूर्वी अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या. या एका गोष्टीने पवार साहेबांनी दाखवून दिले, असा टोलाही रामदास कदम लगावला.