दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । सातारा । भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची अनौपचारिक भेट घेतली . या भेटीत उदयनराजे यांनी पवारांचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली . पवार उदयनराजे यांच्या भेटीचे साताऱ्यात मात्र आगामी पालिका निवडणुकांचे राजकीय अन्वयार्थ लावण्यात आले .
जिल्हा बॅंकेची नुकतीच निवडणूक पार पडली, त्यामुळं अजूनही साताऱ्यात ‘राजकीय रंग’ पहायला मिळत आहे आणि त्यातच भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या असल्यातरी, या भेटीतून आगामी काळात वेगळी राजकीय समीकरणं सातारा जिल्ह्यात उदयास येण्याची शक्यता आहे.
खासदार उदयनराजेंनी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं सातारा लोकसभेची पोटनिवडणूक झाली. यामध्ये उदयनराजे यांना पराभव पत्करावा लागला, तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील सातारा लोकसभेचे खासदार झाले. उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली असली तरी त्यांची शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम व जवळीक संपलेली नाही. मध्यंतरी शरद पवार आजारी होते, त्यावेळी उदयनराजेंनी पुण्यात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यामुळं शरद पवार आणि उदयनराजे यांचं वेगळं नातं निर्माण झालं आहे. सध्या सातारा पालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी शरद पवार यांची घेतलेली ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. गाठीभेटींच्या समीकरणातून उदयनराजे यांनी ऐन क्षणी बिनविरोध निवड शक्य करत जिल्हा बँक गाठली . त्यामुळे पवारांच्या या भेटीत काय राजकीय चर्चा झाली काय ? याची राजकीय उत्सुकता मात्र निश्चित ताणली गेली आहे.