शिवेंद्रराजेंनी उभारलेल्या ‘राजधानी सातारा’वर उदयनराजेंचा सेल्फी; कार्यकर्ते, चाहत्यांच्या गर्दीत फोटोसेशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२१ | सातारा | सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात राजकीय आरोप, प्रत्यारोपाचा सामना रंगला होता. त्यामुळे राजकीय वातावरण गरम झाले होते. त्यानंतर काही दिवस वातावरणात शांतता असताना उदयनराजे पुन्हा सक्रीय झाल्यावर मंगळवारी उदयनराजेंनी चक्क शिवेंद्रराजेंनी पोवईनाक्यावर उभारलेल्या सेल्फी पॉईंटची पाहणी करत तिथे फोटोसेशनही केले.

जिल्हा बँक निवडणुकीचे धुमशान सध्या सुरु आहे. त्यातच खासदार उदयनराजे त्या अनुषंगाने विविध मान्यवरांच्या गाठीभेटी घेत असताना मंगळवारी सायंकाळी आमदार शिवेंद्रराजेंनी स्वखर्चातून पोवईनाक्यावर उभारलेल्या सेल्फी पाईंटचे उद्घाटन होणार होते. तत्पुर्वी सकाळी उदयनराजे आपल्या सहकाऱयांसमवेत पोवईनाक्यावर गेले. तिथे सेल्फी पॉईंटची पाहणीही करु लागले.

तेथे उदयनराजेंना पाहून काहींनी त्यांचे सेल्फी पॉईंटसह छायाचित्र काढले. उदयनराजेंनी देखील सहकाऱ्यांसमवेत तेथे छायाचित्र काढले. बराच वेळ तिथे रंगलेल्या हे फोटोसेशन सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर शहरात याची चांगलीच चर्चा रंगली होती. उदयनराजे केव्हा काय करतील याचा नेम नसल्याने त्यांची प्रत्येक कृती ही सर्वांना अंचबित करुन टाकणारी असते याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांसह त्यांच्या चाहत्यांना देखील आला.

सेल्फी पाँईटवर फोटोसेशन नंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी पत्रकारांनी आपण शिवेंद्रराजेंना दीपावली शुभेच्छा देण्यासाठी भेटणार की नाही असा सवाल केला असता. उदयनराजे म्हणाले, का भेटणार नाही ? त्यांना तर तर भेटलेच पाहिजे. ते पुण्याला गेले आहेत. आले की भेटणारच. नाही भेटले तर मग त्यांना गाठणारच. पण त्यांना भेटणारच. यावेळी त्यांच्या या उत्तरावर उपस्थितांमध्ये मोठा हास्यकल्लोळही उडाला.


Back to top button
Don`t copy text!