उदयनराजे आज करणार मोठी घोषणा; सोशल मिडियावरील ट्वीटमुळे राजकीय चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ फेब्रुवारी २०२२ । सातारा । खासदार उदयनराजे भोसले हे कोणत्या-ना-कोणत्या कारणाने मीडियामध्ये चर्चेत असतात. उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलने ओळखले जातात. तसेच, डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची त्यांची स्टाईल आदींमुळे ते सोशल मिडियावर चर्चेत येतात. दरम्यान, आता उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत उद्या म्हणजेच 24 तारखेला साताऱ्यात एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमकी कोणती घोषणा उदयनराजे भोसले करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ह्या 24 तारखेला एक मोठी घोषणा करायचे मनात आहे. राजकीय आरोप-प्रतिआरोपांच्या ह्या वातावरणात पहिल्याच वाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील, त्यामध्ये काहीच नसणार आहे. उपक्रम अभिनव आहे, तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचे नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

याचबरोबर, आपण सारेच आपल्या भोवती सुरु असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरूस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वत:च एक व्यवस्था उभी करण्याचे ठरविले आहे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

याशिवाय, कोणता प्रश्न, काय व्यवस्था… अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही सदर पत्राने आमंत्रण देत आहोत, असे ट्विटमध्ये म्हणत उदयनराजे भोसले यांनी पत्रकार आणि जनतेला आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता साताऱ्यातील विकास कामांबाबत उदयनराजे भोसले बोलणार आहेत की येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काही राजकीय भूमिका घेणार आहेत, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


Back to top button
Don`t copy text!