
दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । सातारा । सैनिक परंपरा लाभलेल्या सातारच्या भूमीत लष्कर/सैन्य भरती केंद्र सुरु करावे, आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मिलिटरी हॉस्पिटल किंवा कमांड हॉस्पिटलच्या अखत्यारितील वैदयकिय उपकेंद्र तातडीने सुरु करावे या प्रमुख मागण्यासह विविध प्रश्नांबाबत निर्णय घेणेबाबत आज खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाचे संरक्षण मंत्री श्री.ना.राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेवून चर्चा केली. याविषयी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहर आणि जिल्हयाला अव्दितीय अशी
सैनिक परंपरा लाभली आहे. मिलिटरी अपशिंगे सारख्या गावांमधील प्रत्येक घरटी किमान एक व्यक्ती ब्रिटीश आमदनीपासून ते आजपर्यंत सैनिकसेवा आणि देशसेवा बजावत आहे. सातारा जिल्हाज्याप्रमाणे शुरवीरांचा, साधुसंतांचा, मराठा साम्राजयाच्या राजधानीचा जिल्हा म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखला जातो त्याचप्रमाणे आजी माजी सैनिकांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो.
शिवपदस्पर्शाने पवित्र असलेल्या या भुमीतील लढवय्या परंपरेमुळे जिल्हयातील हजारो-लाखो युवक सैन्य भरतीसाठी आसुसलेले असतात. परंतु काही मर्यादा, तांत्रिकतेच्या कारणांमुळे अनेकांची भरती होण्याची संधी हुकत असते. तरी सुध्दा आजरोजी लक्षणिय संख्येने, अनेक युवक सैन्यामध्ये दाखल आहेत. जिल्हयातील माजी सैनिकांची संख्या देखिल सर्वाधिक दखलपात्र आहे. येथुन पुढीलपिढी सुध्दा उपजतच सैनिक परंपरा जोपासणारी आहे. त्यामुळे सातारा येथे सैन्य भरती केंद्र असलेपाहीजे अशी तमाम व्यक्तींची इच्छा आहे. त्यामुळे विकासाला चालना देखिल मिळणार आहे.
सध्या नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, अहमदाबाद, जामनगर या ठिकाणी सैन्य भरती केंद्रे आहेत. सातारा जिल्हयातील तरुणांना पुणे किंवा औरंगाबात -मंबई येथे भरतीसाठी जावे लागते. आजी माजी सैनिकांच्या जिल्हयात सैन्य भरती केंद्र खरेतर आवश्यक आहे. त्यामुळे सैन्य भरती केंद्र सातारा येथे सुरु करण्यात यावे, अशी युवकहिताची मागणी रास्त असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ना.राजनाथसिंह यांना स्पष्ट केले.
तसेच आजी माजी सैनिकांच्या जिल्हयातील सैनिक आणि त्यांचे कुटुंबियांकरीता वैदयकिय सहाय्याकरीता सातारा येथे सैन्य हॉस्पिटल उभारणे अत्यंत गरजेचे आहे. काही लाख व्यक्ती ज्या सैनिकांशी संबंधीत आहेत त्या एकतर सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटल मध्ये त्यांना आवश्यक असणारे उपचार घेत आहेत. प्रत्येक पावलावर स्वतःचे मरण दिसत असताना सुध्दा सर्वसामान्य नागरीकांचे जीवन फुलवण्यासाठी आणि मायभुमीचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र बाजी लावणा-या सैनिकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना स्वतंत्र व दर्जेदार वैदयकिय सेवा पुरवणे हे आपले परम कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. याच भावनेतुन देशासाठी जीवाची पर्वा न करणा-या आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आर्मी हॉस्पिटलची उभारणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. किमान कमांड हॉस्पिटलचे उपकेंद्र सातारा येथे तातडीने सुरु करण्याबाबत सूचना जारी कराव्यात अशी मागणी देखिल यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली. दरम्यान, ना.राजनाथसिंह यांनी आस्थेवाईपणे माहीती घेत, सातारा जिल्हयासह
महाराष्ट्रातील विशेष करुन पश्चिममहाराष्ट्रातील विविध घडामोडी आणि विषयांवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेशी सविस्तर चर्चा केली. तसेच सैन्य भरती केंद्र आणि आर्मी हॉस्पिटल बाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत आश्वस्त केले.