स्थैर्य, फलटण, दि.०६ : निंबळक, ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी, माजी सरपंच, समाजहिताच्या उपक्रमातील अग्रेसर नेतृत्व उदयसिंह नानासाहेब निंबाळकर तथा काका यांचे वयाच्या ८६ वर्षी पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराने निधन झाले.
उदयसिंह निंबाळकर तथा काकांच्या अकस्मात निधनामुळे निंबळक गावावर शोककळा पसरली आहे. काकांचे निंबळक गावाच्या सामाजिक, आर्थिक, विशेषतः शेती विषयक सुधारणा घडवून आणण्यासाठी फार मोठे योगदान आहे.
निंबळकचे सरपंच, फलटण तालुका सहकारी दुध पुरवठा संघाचे संचालक, श्री निमजाईदेवी देवस्थान ट्रस्टचे सदस्य वगैरे पदावरुन काम करताना समाजातील सर्व स्तरातील लोकांशी आपलेपणा ठेऊन त्यांनी काम केले.
गावातील अनेक जण कौटुंबिक, शेती, मुलांचे शिक्षण वगैरे अनेक बाबतीत काकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जात असत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन योग्य मार्गदर्शन करण्यात, आपल्या निवासस्थानी येणाऱ्यांबरोबर आपलेपणा ठेऊन त्याला योग्य मार्गदर्शन करण्यात ते धन्यता मानत असत.
राज्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसाईक राम निंबाळकर यांचे ते वडील होत.