दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । फलटण । मुधोजी महाविद्यालयाचे ‘उदय’ वार्षिक नियतकालिक हे महाविद्यालयाच्या उपक्रमांचे प्रतिबिंब दर्शविणारा आरसा आहे. विद्यार्थ्यांमधील सृजनात्मक लेखन कौशल्य विकसित करण्याकरिता ‘उदय’ वार्षिक नियतकालिक एक मुक्त व्यासपीठ असून विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना व कौशल्यांना वाव देणारे आशय गर्भ माध्यम आहे. असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयाच्या ‘उदय’ वार्षिक नियतकालिक 2020-21 चा प्रकाशन समारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी ते पुढे असेही म्हणाले की, या वार्षिक नियतकालिकात समाविष्ट मुलाखती, संशोधनपर लेख, वैचारिक लेख, आत्मकथन, प्रेरणादायी कथा, पुस्तक परीक्षण, व्यंग्यचित्रे, फोटोग्राफी, रंगचित्रे हे सर्व निश्चितच विद्यार्थ्यांच्या प्रगल्भ कल्पकतेतून साकार झाल्यामुळे ‘उदय’ अंक निश्चितच दर्जेदार व लक्षवेधी बनला आहे. अंकाचे मुखपृष्ठ ‘Save biodiversity, Save world’ हा संदेश प्रक्षेपित करणारे असून मलपृष्ठावरील चित्रकृती विशेष लक्षवेधी आहे.
कोरोना काळातील व्हेंटिलेटरची व ऑक्सिजनची कमतरता विचारात घेता भविष्यकाळात ऑक्सिजनची टंचाई भासू नये याकरिता ‘वृक्ष संगोपनाच्या व्रताची पूर्तता’ हा संदेश जागतिक स्तरापर्यंत बहुमोल ठरणार आहे. असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी सन ग्राफिक्सचे मुद्रक उमेश निंबाळकर, ‘उदय’ चे मुख्य संपादक प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर व संपादक मंडळातील सर्व सदस्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रकाशन समारंभास महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्र-संचालन प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी केले.