स्थैर्य, वाई, दि .२६: रुळे (ता. महाबळेश्वर) गावातील दोन तरूणांचा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. अनिकेत भीमराव कदम (वय १८ ) आणि सुशांत लक्ष्मण कदम (वय १८) अशी या दोन तरुणांची नावे आहेत.
आज रुळे गावच्या ग्रामदैवताची यात्रा होती. यात्रा साजरी होणार नसली तरी देवदर्शन होणार होते. त्यासाठी सुशांत हा मुंबई वरून यात्रेसाठी गावी आला होता. आपल्या गावातील मित्र अनिकेत हा जनावरे चारायला घेऊन निघाला असता, आपणही तिकडे जावे म्हणून सुशांत देखील अनिकेत सोबत गेला. जनावरे कोयना धरण शिवसागर जलाशयाकाठी चरत असतानाच दोघांनाही पोहण्याचा मोह झाला.
अनिकेत हा कायम गावातच राहत असल्याने त्याला पोहायला येत होते. मात्र सुशांतला पोहायला येत नव्हते. दोघेही कपडे काढून सायंकाळच्या सुमारास पोहायला कोयना नदीत उतरले. मात्र सुशांतला पोहायला येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी अनिकेत त्याला वाचवण्यासाठी सरसावला असता, सुशांतने त्याला मिठी मारली असावी, त्यातच दोघेही बुडाले. खूप वेळ होउनही मुले घरी का आली नाहीत म्हणून घरातील व गावातील लोकांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी नदीकाठी कपडे दिसल्याने दोघेही बुडल्याचे सिद्ध झाले. गावातील दोन मुले बुडल्याने रुळे ग्रामदैवतेचे यात्रेचे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान अद्यापही दोघांचे मृतदेह सापडले नसल्याने शोधकार्य सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास मेढा पोलिस ठाणे अंतर्गत तापोळा पोलिस आऊट पोस्टचे हवालदार गायकवाड व माने तपास करत आहेत.