डॉक्टरला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळल्याप्रकरणी दोन संशयित महिलांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली


 

स्थैर्य, सातारा, दि.२९: सातारा येथील एका डॉक्टरला ब्लॅकमेल करून 12 लाखांची खंडणी उकळणार्‍या श्रद्धा अनिल गायकवाड आणि पुनम संजय पाटील (सध्या रा. सोमवार पेठ सातारा, मूळ रा. कोथरूड पुणे) यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून संशयीत महिलांनी पुण्यातही काहीजणांना गंडा घातला आहे. त्यामुळे या महिलांची पोलीस कोठडी संपताच न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी सखोल तपासासाठी आणखी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने संशयीत महिलांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

कोथरूड परिसरामध्ये अनेकांना या महिलांनी गंडा घातला आहे. मात्र तक्रारदार पुढे येत नसल्याने पोलिसांनी आता स्वतःहून तक्रारदारापर्यंत पोचण्यास सुरुवात केली आहे. कोथरूड परिसरामध्ये असलेल्या एका फ्लॅटमध्ये या दोन्ही महिला वास्तव्य करत होत्या. त्याठिकाणी जाऊन पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली. त्यावेळी सोने खरेदी केलेल्या काही पावत्या तसेच मोबाईलचे सिम कार्ड, बँक पासबुक पोलिसांच्या हाती लागले आहे. या महिलांनी ज्या ठिकाणी सोने खरेदी केले होते. त्या दुकानांमध्ये त्यांना नेण्यात आले होते. संबंधित दुकानदाराने सोने खरेदीच्या आणखी पावत्या पोलिसांना दिल्या आहेत. कोथरुड पोलीस ठाण्यामध्ये या महिलांनी काही पुरुषाविरोधात तक्रार अर्ज दाखल केले होते.

शाहूपुरी पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जावून तपास करत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी किती जण आहेत? किती जणांना या महिलांनी गंडा घातला? याचा तपास सुरू असून आणखी काही प्रकरणी उजेडात येवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!