दैनिक स्थैर्य | दि. ०३ नोव्हेंबर २०२१ | सातारा | सातारा येथील व्यंकटपूरा पेठेतील चैतन्य वास्तू अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या कामाच्या ठिकाणाहून सोळा हजार रुपये किंमतीच्या सेंट्रिंग प्लेटा चोरी कणराऱ्या दोन महिलांना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे. सोमवती विजय घाडगे आणि सुरेखा शिवाजी जाधव अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, चैतन्य वास्तू अपार्टमेंटच्या कामाच्या ठिकाणावरुन सोळा हजारांच्या अठरा लोखंडी सेट्रींग प्लेटा चोरी झाल्याची तक्रार आनंद रामण्णा बिराददार (रा . गोखले हौदाजवळ, व्यंकटपुरापेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्याचा तपास करण्याबाबतची सूचना पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम आणि त्यांच्या टीमला दिली होती.
त्यानुसार याचा तपास सुरु होता. दरम्यान, रविवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना सेट्रिंग प्लेटा चोरीतील संशयित महिलांबाबत माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला आणि त्या महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघींनीही आपली नावे सोमवती विजय घाडगे आणि सुरेखा शिवाजी जाधव (दोघी रा. सैदापूर, ता. सातारा) अशी सांगितली. त्यांच्याकडे कौशल्याने चौकशी केली असता त्यांनी सेंट्रिंग प्लेटा चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्यांनी चोरुन नेलेला मुद्देमालही पोलिसांकडे दिला असून तो हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, कॉन्स्टेबल मोहन पवार, पंकज मोहिते , ओंकार यादव आदी सहभागी झाले होते.