दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. शुभम दीपक कडव आणि अनमोल महेंद्र कांबळे अशी अटक केलेल्याची नावे आहेत. एलसीबीने या दोघांनाही अधिक चौकशीसाठी मेढा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमवार, दि. २0 रोजी सायंकाळच्या सुमारास सातारा येथील करंजे परिसरात दोन इसम चोरीची नंबर प्लेट असलेली होंडा शाईन दुचाकी घेवून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांना तपासाबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार, वाघ आणि त्यांच्या पथकाने करंजे येथे सापळा लावला होता. यावेळी या पथकाला दोन इसम नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन फिरताना आढळून आले. दोघांनाही पोलिसांनी अडवले आणि त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता दोघांनीही ही दुचाकी आगलावेवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथून चोरी केली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपली नावे शुभम दीपक कडव (वय २३, रा. आझादनगर, शाहूपुरी, सातारा) आणि अनमोल महेंद्र कांबळे (वय १९, रा. जावळी, जि. सातारा) अशी सांगितली. दरम्यान, या दुचाकीच्या अनुषंगाने एलसीबीने मेढा पोलीस ठाण्याकडे चौकशी केली असता संबंधित दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली असल्याची माहिती देण्यात आली. या दोघांनाही अधिक चौकशीसाठी मेढा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, विजय कांबळे, अतिश घाडगे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, मंगेश महाडिक, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, सचिन ससाणे, रोहित निकम, गणेश कचरे आदी सहभागी झाले होते.