दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शहर आणि परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या सातारा तालुक्यातील कुशी येथील अट्टल दुचाकी चोरट्याला जेरबंद केले आहे. आशुतोष दीपक भोसले अशी जेरबंद केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, आशुतोष याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखा त्यादृष्टीने तपास करत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून वारंवार दुचाकी चोरीच्या घडत आहेत. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले होते. यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम आणि पोलीस पथक सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दुचाकी चोरीबाबत एका संशयिताची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून होते. तो सापडल्यानंतर त्याला ताब्यात घेवून संशयिताकडे गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्याच्या आधारे कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता धक्कादायक माहिती मिळाली. यावेळी त्याने आपले नाव आशुतोष दीपक भोसले (वय २२, रा. कुशी, ता. जि. सातारा) असे सांगितले.
चौकशीमध्ये त्याने संभाजीनगर परिसरात राहून काही दुचाकी चोरी करत विविध ठिकाणी दिल्या असल्याचे सांगितले. आशुतोष याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या नऊ दुचाकी हस्तगत केलेल्या आहेत. दरम्यान दहापैकी एक दुचाकी भुईंज येथून साथीदारामार्फत चोरी केली असल्याचे त्याने कबूल केले आहे.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, ज्योतीराम पवार, अभय साबळे, विक्रम माने, गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ सहभागी झाले होते.