दैनिक स्थैर्य | दि. १ मार्च २०२४ | फलटण |
परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी मार्च २०२२ मध्ये हेल्मेट सक्तीचे परिपत्रक काढलेले असून केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ अन्वये हेल्मेट व सीटबेल्ट बंधनकारक असताना बरेचसे नागरिक अजूनदेखील हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत असून रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकाद्वारे नागरिकांना केले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, वाहन अपघातात मृत्यू पावल्यानंतर इन्शुरन्स कंपनीदेखील अपघातावेळी दुचाकीचालकाने हेल्मेट घातले होते का? किंवा चारचाकी चालकाने सीटबेल्ट लावला होता का? याची पडताळणी करीत असते. त्यामुळे हेल्मेट व सीटबेल्ट घातल्यास आपला जीव वाचविता येईल. तसेच इन्शुरन्सकरीता क्लेम करणेदेखील सोईचे होणार आहे. अपघातामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्यात दाखल होणार्या प्रथम खबरी अहवालामध्ये हेल्मेट व सीटबेल्टचा वापर केला असल्यास तशी नोंद घेण्यात येत असते. त्यामुळे अपघातग्रस्तांना इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम मिळणे सोईचे होते. त्यामुळे नागरिकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.