
दैनिक स्थैर्य । दि.१० जानेवारी २०२२ । सातारा । सातारा शहरातील विविध भागात जबरी चोरी, दुचाकी तसेच बॅटरी चोऱ्या करुन फरार झालेल्या त्रिकुटाला शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे. अभिषेक कुचेकर, अक्षय लोखंडे, विपूल नलवडे या तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी त्यांची नावे असून त्यांनी केलेल्या सहा गुन्ह्यांची कुबली दिली आहे. दरम्यान, या त्रिकुटाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यांच्याकडून चार दुचाकीसह १.९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा शहर आणि परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे त्यातील सहभागी आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि त्यांच्या टीमला तपासाबाबतचे आदेश देवून आरोपींना जेरबंद करा, असे बजावले होते.
सोमवार, दि. ३ रोजी सायंकाळी पाच वाजता शाहूपुरी डीबीचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना दुचाकी चोरी करणारा अभिलेखावरील अभिषेक मार्तंड कुचेकर (वय १९. रा. करंजे, सातारा) हा दुचाकीवरुन (एमएच ११ – एआर ८३८६) वेगाने करंजेनाका परिसराकडे जाताना दिसला. दरम्यान, त्याच्याकडे असणारी दुचाकी चोरीची असल्याचा पोलिसांना संशय आल्यामुळे त्याचा पाठलाग केला आणि त्याला करंजे नाका येथे रोखले. यावेळी अभिषेककडे विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण पध्दतीने तपास दिला असता त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याने सातारा येथील जिल्हा काँग्रेस भवनाशेजारी असणाऱ्या मसजिदीजवळून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे आणखी काही दुचाकींच्या चोरीच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी शाहूपुरी आणि सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हदद्दीत असणाऱ्या विविध भागातून दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्याचबरोबर या दुचाकी त्याने शिरवळ, पुणे येथे ठेवल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिसांनी तेथे जावून या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
अभिषेकला ताब्यात घेतलेल्या संशयिताला पोलीस कोठडी मिळल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या अक्षय रंगनाथ लोखंडे (वय २१, रा. सैदापूर, ता. सातारा), विपूल तानाजी नलवडे (वय २१, रा. पिलेश्वरी नगर, करंजे, सातारा) या दोन साथीदारांच्या मदतीने सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीबरोबरच तीन दुचाकी आणि एका गाडीच्या बॅटरीची चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, अक्षय लोखंडे आणि विपूल नलवडे हे दोघे अन्य एका प्रकरणात कारागृहात होते. मात्र, अभिषेकने दिलेल्या माहितीच्या आधारे कारागृहात असलेल्या अक्षय, विपूल या दोघांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनीही काही गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
अटक केलेल्या तिघांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दुचाकी, दोन दुचाकींची बॅटरी चोरी त्याचबरोबर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन दुचाकी चोरी असे आठ गुन्हे केले आहेत. यापैकी दोन गुन्ह्यांची उकल यापूर्वीच झाली असून त्यामध्ये त्यांचा शोध सुरु होता. मात्र, आता त्यांच्याकडून आणखी सहा गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अभिषेक मार्तंड कुचेकर, अक्षय रंगनाथ लोखंडे, विपूल तानाजी नलवडे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय पतंगे, डीबीचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, कॉ. लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, कॉ. सचिन पवार, स्वप्नील सावंत, महिला पोलीस नाईक शोभा वरे आदी सहभागी झाले होते.