कंपनी प्रॉडक्टवरील चुकीच्या एमआरपीप्रकरणी कारवाई न करण्यासाठी मागितली दहा हजारांची लाच
स्थैर्य, सातारा, दि. 31 : स्टार किंग कुलंटवरील लेबलवरील पॅक केलेली तारीख आणि एमआरपी किंमत चुकीची छापली असल्याबाबत कारवाई न करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी वैधमापनशास्त्र कार्यालय कराड कार्यालयातील निरीक्षक आणि क्षेत्र सहायक अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, तक्रारदाराच्या पत्नीचे नावे असलेल्या कंपनीत स्टार किंग कुलंंट हे प्रॉडक्ट बनते. या प्रॉडक्टच्या लेबलवर ‘व्हेन पॅकड्’ म्हणजेच लेबल पॅक केलेली तारीख आणि त्यावरील एमआरपी किंमत चुकीची दर्शवल्याप्रकरणी वैधमापनशास्त्र कार्यालय (कराड)चे निरीक्षक वर्ग -2 लहू उत्तम कुठे रा. अंबाई डिफेन्स कॉलनी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि चंद्रकांत राजाराम जाधव, क्षेत्र सहायक, वर्ग-3 रा. आंबेगाव ता. कडेगाव यांनी दहा हजारांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने सातारा येथील अँटिकरप्शनच्या कार्यालयात तक्रार दिली. याबाबतची पडताळणी एसीबीच्या पथकाने केल्यानंतर दोन्ही संशयीतांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पो.ना. राजे, पो. शि. काटकर, भोसले आदींनी केली.