
स्थैर्य, फलटण, दि. 10 : सातारा वनविभाग सातारा अंतर्गत वनपरिक्षेत्र फलटण च्या कार्यकक्षेत येणा – या मौजे – टाकळवाडे ता.फलटण जि.सातारा या गावामध्ये साधारणत एक आठवडयापासून बिबटया सदृश्य वन्यप्राणी ग्रामस्थांना दिसून येत आहे. तसेच त्याने एक जर्सी गाय व दोन पाळीव कुत्र्यांची शिकार केलेने मौजे टाकळवाडे ग्रामस्थ, फलटण तालुक्यातील विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार मौजे टाकळवाडे गावामधील बिबटयाचा वावर असणाऱ्या ठिकाणी बिबटया सदृश्य पिंजरा लावणेत आलेला असून सदर ठिकाणच्या बिबटयाच्या हालचाली टिपण्यासाठी दोन ट्रॅप कॅमेरे बसविणेत आलेले आहेत. यावर वनअधिकारी / कर्मचारी लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती फलटणचे वनक्षेत्रपाल एम. यु. निकम यांनी दिली.
तालुक्यातील टाकळवाडे गावातील नाझीरकर वस्तीच्य हद्दीत किरण नाझीरकर यांच्या समोर एका कुत्र्यावर सायंकाळी हल्ला चढवून त्याला फस्त केलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून या बिबट्यापासून संरक्षण मिळावे यासाठी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची पूर्ण तयारी वन विभागाने केलेली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास टाकळवाडे गावातील नाझीरकर वस्ती वर किरन नाझीरकर यांच्या राहत्या घरा पासून 100 फूट अंतरावर असलेल्या उसामध्ये कुत्रा का भुंकत आहे हे पाहण्यासाठी निघाले असता. ऊसा बाहेर साधारण 20 फूट अंतरावर उभे असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवून कुत्र्याला ओढत नेले. किरण नाझीरकर त्यांनी घडलेला प्रकार पाहिला. त्यानंतर बिबट्या तेथून निघून गेला. घटना घडली तेथून ५०० मिटर वर सापळा लावण्यात आला आहे. या भागात बिबट्याचा वावर असून तेथील अन्य प्राण्याना व तेथील रहिवासी यांना ही धोका आहे. त्याबाबत शेतकरी व नागरिकांनी तक्रारी करूनही वन विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री उठावे लागते. त्यामुळे त्यांना पाणी भरताना अडचणींचा सामना करावा लागतो. आता बिबट्याच्या दहशतीमुळे त्यांना घराबाहेर पडणेही अडचणीे ठरत आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.