
स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑगस्ट : भाड्याने देण्याच्या बहाण्याने दोन ट्रॅक्टर घेऊन, त्याचे भाडे न देता ते परस्पर दुसऱ्यालाच देऊन टाकून फसवणूक केल्याप्रकरणी कर्नाटकातील एका व्यक्तीविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील शेतकरी विनय संपत माने यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
फलटण शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनय माने यांनी आपले दोन जॉन डिअर ट्रॅक्टर भाड्याने देणे असल्याची जाहिरात फेसबुकवर टाकली होती. ती जाहिरात पाहून आरोपी मोहम्मद मुस्ताक मोहम्मद हुसेन (रा. चित्रदुर्ग, कर्नाटक) याने माने यांच्याशी संपर्क साधला आणि कर्नाटक येथे रस्त्याच्या कामासाठी दरमहा ८० हजार रुपये भाड्याने दोन्ही ट्रॅक्टर ११ महिन्यांच्या करारावर घेतले.
यासाठी फलटण येथे दि. ११ मार्च २०२५ रोजी रीतसर भाडेकरार करण्यात आला आणि आरोपीने ८० हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले. मात्र, एक महिन्यानंतर भाडे देण्यास टाळाटाळ करून आरोपीने आपला मोबाईल बंद केला. माने यांनी अधिक चौकशी केली असता, आरोपीने दोन्ही ट्रॅक्टर परस्पर तमिळनाडूमध्ये कोणाला तरी दिल्याचे उघड झाले.
या फसवणुकीप्रकरणी विनय माने यांच्या तक्रारीवरून मोहम्मद मुस्ताक मोहम्मद हुसेन याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पूनम बोबडे करत आहेत.