
स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑगस्ट : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता सातवीच्या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश संपादन केले आहे. स्वराज सचिन फाळके याची आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे येथे, तर यश भगवान खवळे याची राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत निवड झाली आहे. या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच प्रशालेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे येथे झालेल्या निवड प्रक्रियेत भारतभरातून केवळ सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून स्वराज फाळके याने बाजी मारली. त्याचे पुढील शिक्षण आता आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे. त्याचबरोबर, यश खवळे याने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सी. एल. पवार, मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), मंगेश दोशी, बाळासाहेब भोंगळे, तुषार गायकवाड आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सचिन सूर्यवंशी म्हणाले, “आमची संस्था विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नेहमीच वाव देते आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करते. त्यामुळेच विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करत आहेत.” स्वराजचे पालक, फाळके यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक आणि पालकांच्या संयुक्त भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले व प्रशालेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्या एन. एम. गायकवाड, उपप्राचार्य पी. डी. घनवट आणि पर्यवेक्षिका सी. आर. रणवरे यांनी केले.