
दैनिक स्थैर्य | दि. 10 जुलै २०२३ | सातारा |
सातार्यातील आकाशवाणी, नामदेववाडी, लक्ष्मी टेकडी, वनवासवाडी या झोपडपट्टी परिसरात एलसीबीने शुक्रवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून नऊ जणांना अटक केली. यावेळी पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, तीन कोयते, एक तलवार असा मोठा शस्त्रसाठा सापडला.
एसपी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मधुकर गुरव, मदन फाळके यांच्या अधिपत्याखाली ४० पोलिस अंमलदारांची स्वतंत्र सहा पथके तयार केली. या पथकांनी संपूर्ण रात्र सर्व झोपडपट्ट्या अक्षरश: पिंजून काढत आरोपींची धरपकड केली.
या कारवाईत स्वप्निल पोपट जाधव (वय ३२, रा. सराफवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे, सध्या रा. मोळाचा ओढा, सातारा) याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आढळली. अजंठा चौक येथील महामार्गाच्या पुलाखाली शशिकांत सुभाष साळुंखे (रा. तांदुळवाडी, ता. कोरेगाव) याच्याकडे एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक दुचाकी आढळली. निकेत वसंत पाटणकर (२८, रा. चंदननगर, कोडोली) याच्याकडे एक कोयता सापडला. सुदर्शन राजू गायकवाड (२९, रा. आकाशवाणी झोपडपट्टी केंद्राजवळ, सातारा) याच्याकडेही एक कोयता सापडला. तर याच परिसरात राहणार्या संदीप पप्पू शेख (१९) याच्याकडे एक तलवार सापडली.