पुळकोटीत ओढ्याच्या पुरात दुचाकीसह दोनजण गेले वाहून, एक बचावला, एकाचा शोध सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ डिसेंबर २०२१ । माण । चक्रीवादळाने दोन दिवसांपासून म्हसवडसह माण तालुक्यात हाहाकार घातला असून शुक्रवारी रात्री आठ वाजता नदी नाले ओढे पुराने वेढा दिला होता. या अवकाळी पावसाने पुळकोटी येथील ओढ्याला पूर आल्याने पुराचे पाणी पुलावरुन जोरात वाहत येत होते. या पाण्यात मोटार सायकलीवरुन दोनजण वाहून गेले. यातील उत्तम शंकर बनसोडे वय 50 बेपत्ता झाले तर रणजित ज्ञानू चव्हाण हे पोहत पाण्याबाहेर आल्याने वाचले. बेपत्ता बनसोडे यांचा शोध शनिवारी सायंकाळी सहापर्यंत सुरू होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी, चार दिवसांपासून सतत अवकाळी पावसाने सर्वत्र हाहाकार घातला होता. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे म्हसवड परिसरातील ओढ्यांना पूर आला होता. म्हसवडपासून सहा किलो मीटर अंतरावर असलेल्या पुळकोटी या गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर पूल असून या पुलावरुन तिने फुट पाणी वाहत असताना शुक्रवारी रात्री 11 च्या दरम्यान पुळकोटी येथे राहणारे उत्तम शंकर बनसोडे वय 50 व रणजित ज्ञानू चव्हाण वय 45 हे दोघे आपल्या मोटार सायकलीवरुन म्हसवड येथील काम करुन पुळकोटीकडे निघाले होते. पुलावर दोन-तीन फुट पाणी वाहत असतानाही चव्हाण यांनी मोटारसायकल वाहत्या पाण्यात मोटारसायकल घातली. पाणी जास्त प्रमाणात ओढत असल्याने मोटारसायकलसह दोघेही पुलाखाली पाण्यात वाहत गेले. यावेळी मोटारसायकल चालवणारे चव्हाण पाण्याबाहेर निघाले मात्र बनसोडे हे पट्टीचे पोहणारे असतानाही पाण्यात वाहत गेले. ही घटना गावात समजताच लोक ओढ्यानजीक जमा झाले. मात्र पाणी जास्त व पाऊस येत असल्याने काहीच करता येत नव्हते. शनिवारी सकाळीपासून पीएसआय विशाल भंडारे, तलाठी वाघमारे, पोलीस पाटील बनसोडे व पोहणारे यांनी ओढ्यात बनसोडे यांचा शोध घेतला. शनिवारी सायंकाळी सहापर्यंत शोध सुरु होता. घटनास्थळी माणचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी जाऊन पीएसआय विशाल भंडारे तलाठी वाघमारे, पोलीस पाटील बनसोडे व सरपंच सावंत यांच्याशी शोधकार्याची माहिती घेतली. पुळकोटी येथील दोन बंधारे शिरताव परिसरातही शोध घेतला, परंतु, ते सापडले नाहीत.


Back to top button
Don`t copy text!